Sunday, September 8, 2024
HomeUncategorizedमिले सुर मेरा तुम्हारा... - राधिका गोडबोले

मिले सुर मेरा तुम्हारा… – राधिका गोडबोले

संगीताची उत्पत्ती पाण्याचा, वार्‍याचा आवाज, पशू पक्ष्यांचे आवाज, पानांची सळसळ अशा ध्वनींतून संगीताचा जन्म झाला. बांबूच्या बनातून वाहणार्‍या वार्‍यामुळे बासरीचा जन्म झाला, मृदूंग खुंटीवरून पडून तुटला तब भी बोला म्हणून त्याचा तबला झाला अशा अनेक सुरस कथा आपल्या संगीत परंपरेत आढळतात. सांस्कृतिक मिलाफ, विचारवंत कलाकारांचं योगदान या सगळ्यामुळे विविध वाद्ये, गायन, वादन शैली विकसित होत गेल्या. काही जुनं सुटत गेलं, काही नवीन येत गेल..पण संगीत परंपरा अव्याहत, अखंड आहे…राहील..

भाषा निर्माण होण्याच्या आधी संगीत निर्माण झालं. भारतीय संस्कृतीतील शास्त्रीय संगीताला शेकडो, हजारो वर्षाची परंपरा आहे. श्रीकृष्णाची बासरी, भगवान शंकराचा डमरू, नारदांची एकतारी , सरस्वतीची वीणा असा आपला संगीत वारसा आपण मानतो. चार वेदांपैकी सामवेद हा पूर्णपणे संगीतमय असल्याचं दिसून येतं. सामगायनामध्ये स्वरीत, उदात्त व अनुदात्त या तीन स्वरांचा प्रयोग केला जात असे. पुढे कालपरत्वे या तीन स्वरांवरून चार स्वर, चारवरून पाच स्वर व पुढे पाचवरून सात स्वरांपर्यंत असा स्वरविकास याच वैदिक कालखंडात झाला हे या सप्त स्वरतु गीतन्ते सामभि: सामगैबुधै। ओळीवरून सिद्ध होते असं विद्वानांचं मत आहे.

- Advertisement -

पुढे कोमल आणि तीव्र मिळून बारा स्वर आणि बावीस श्रुती आणि या स्वरांच्या विशिष्ट रचने नुसार विविध राग तयार झाले. या प्रवासात अनेक विचारवंत, अभ्यासक यांचं योगदान आहे. पौराणिक काळापासून संगीत परंपरा असल्याचं आपण मानतो. अभ्यासकांनी संगीताचा विकास अभ्यासण्यासाठी प्राचीन काळ (आदिकाळ ते इ.स. 800 पर्यंत) मध्य काळ (इ.स. 800 ते इ.स. 1800 पर्यंत) आधुनिक काळ (इ.स. 1800 ते आजपर्यंत) अशी विभागणी केलेली दिसते.

आज भारतीय शास्त्रीय संगीताचे जे स्वरूप आहे ते साधारण इ स 1800 पासूनचे. संगीताची उत्पत्ती पाण्याचा, वार्‍याचा आवाज, पशू पक्ष्यांचे आवाज, पानांची सळसळ अशा ध्वनींतून संगीताचा जन्म झाला. बांबूच्या बनातून वाहणार्‍या वार्‍यामुळे बासरीचा जन्म झाला, मृदूंग खुंटीवरून पडून तुटला तब भी बोला म्हणून त्याचा तबला झाला अशा अनेक सुरस कथा आपण ऐकत आलो आहोत. मार्गी संगीत आणि देशी संगीत असे संगीताचे दोन मुख्य प्रकार पूर्वी मानले जात. भरत मुनींचे नाट्यशास्त्र , मतंग ऋषींचं बहुद्देशी या ग्रंथांमध्ये या संगीताचा उल्लेख आढळतो. देशी संगीत म्हणजेच लोकसंगीत. पुराणकथा, हरिकथा, कीर्तन हे गाऊनच सादर केले जाते, पूर्वी मंदिरांमधून प्रबंध गायन होत असे. यातूनच धृपद प्रकाराचा उदय झाला असं मानलं जातं. धृपद, धमार, ख्याल गायकी यांच्या उगमाविषयी अनेक कथा, वाद आहेत.

घराण्यांच्या उगमाचे कारण मुख्यतः कलाकारांच्या निवासाचे शहर अथवा त्यांना राजाश्रय मिळालेल्या राजाचे स्थान हेच सांगितलं जातं. व्यापारानिमित्त येण्या जाण्या मुळे बाली, तुर्कस्थान, पोर्तुगाल, इंग्लंड अशा अनेक संस्कृतींचा प्रभाव भारतातील सामाजिक तसेच सांस्कृतिक, सांगीतिक जीवनावरही पडत गेला.

असं म्हणतात की, या विश्वात फक्त बदल हाच कायम आहे, हे तत्व संगीतालाही लागू आहे. साहित्यात समाजाचं प्रतिबिंब दिसतं असं म्हणतात. तेही संगीताच्या बाबत होत आलं आहे, होत आहे.

संगीत हे बुद्धी आणि भावना दोन्हींना आव्हान करू शकते आणि संगीतासाठी दोन्ही गोष्टी आवश्यक असतात.

सांस्कृतिक आक्रमण, मिलाफ, विचारवंत कलाकारांचं योगदान या सगळ्यामुळे विविध वाद्ये, गायन, वादन शैली विकसित होत गेल्या, काही प्रकार कालबाह्य झाले. संगीत रत्नाकरसारख्या श्रेष्ठ ग्रंथातील मानघात, गीतक, वासव, सुशोभी, सुमती असे ताल आता माहीतही नाहीत. वृन्दगायनसारखे प्रकार मागे पडले. त्यासाठी वाजवली जाणारी मेहडी , करठा, धपस, चौंडक, डक्का अशी वाद्येही कालबाह्य झाली. त्यापैकी काही आता रणजीत बारोट, त्रिलोक गुर्टू, तौफिक कुरेशी, शिवमणी सारख्या पर्कशनिस्टमुळे ( वादद्यमेळकार ) पुन्हा वाजत आहेत. आदिकाळापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत संगीत पद्धती, प्रकार याच्यात झालेला बदल हा त्यामानाने हळूहळू झाला परंतु वीस आणि एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळं संगीत शिकण्या शिकवण्याच्या, सादरीकरणाच्या पद्धती, अभिव्यक्ती, संकल्पना यांच्यात झपाट्यानं बदल होत गेले.

अनेक संस्कृतींचे आक्रमण होऊनही त्या महापुरात भारतीय संगीत अढळ राहिलं. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, विष्णू नारायण भातखंडे अशा विचारी, दूरदर्शी कलावंतांनी ते अढळपदी नेऊन ठेवलं आहे. आपल्याकडे गुरुमुखी विद्याच दिली जात असल्यामुळे लिखित स्वरूपात राग स्वरूप, बंदिशी, रचना किंवा नियम असं काही फारसं नव्हतंच. या प्रभुतींनी सांगीतिक खजिन्याचे संकलन केले. लिहिण्यासाठी योग्य पद्धत दिली. भातखंडे यांनी भरताच्या नाट्यशास्त्राचा आणि संगीत रत्नाकर या प्राचीन भारतीय संगीतविषयक ग्रंथांचा अभ्यास केला आणि हिंदुस्तानी संगीतातील विस्कळीत वैविध्याला पद्धतशीर चौकटीत बसवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी राग, रागिण्या आणि पुत्ररागांमध्ये वर्गीकरण करण्याच्या जुन्या पद्धतीऐवजी थाट पद्धत नावाची नवी वर्गीकरण पद्धत हिंदुस्तानी संगीतामध्ये आणली. पंडित पलुस्कर यांनी संगीतविषयक क्रमिक पुस्तके लिहिली. स्वरलिपी तयार केली. जी मपलुसकर-पद्धती म्हणून ओळखली जाते.

1901 साली लाहोर येथे त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. हिंदुस्तानी संगीताचा प्रसार-प्रचार व्हावा, ते शिकण्याची सोय व्हावी या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतात ठिकठिकाणी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली.

भारतीय शास्त्रीय संगीत पाश्चात्य देशांमध्ये पोहोचवण्यास सुरुवात करून भारतीय गायक वादकांसाठी परदेशातील वाटा रुळवून दिल्या, व्यासपीठ खुले केले ते पं रविशंकर, उस्ताद अल्लारखां, विलायत खां, अली अकबर खां यांच्यासारख्या कलावंतांनी.

आपल्या संगीताची मोहिनी परदेशातील संगीतप्रेमींवर अशी पडली की, अनेकांनी भारतीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. ही संख्या वाढतेच आहे. घराण्याची वैशिष्ट्ये जपून आपलं गायन-वादन अधिक समृद्ध करण्यासाठी इतर घराण्याची वैशिट्ये आत्मसात करण्यास सुरुवात झाली. पाश्चिमात्य शास्त्रीय कलाकारांबरोबर फ्युजन करण्यास सुरुवात झाली. त्याबद्दल अनेकांनी नापसंती दर्शवली. परंतु आपल्या संगीताला धक्का न लावता रसिकांना एक वेगळा आनंद देणारा हा प्रकार उस्ताद झाकीर हुसेन, निलाद्री कुमार, विक्कू विनायकम अशा सांगीतिक नियम पाळून रंजक वादन करणार्‍या अनेक कलाकारांमुळे खूपच रसिकप्रिय झाला आहे.

भारतीय संगीतावर पाश्चिमात्य संगीताचं आक्रमण होतं आहे, त्याचं शुद्ध स्वरूप राहत नाहीये असं काही जण म्हणत असले तरी ते शिकणार्‍यांची संख्या वाढते आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आता या शिकण्या-शिकवण्याला देश भाषेच्या सीमाही अडचण ठरू शकत नाहीत. कोरोना काळात तर याचा अनुभव इतरही क्षेत्रातही सगळ्यांनी घेतला आहे.

विज्ञानामुळे आता छोटीसी ये दुनिया असं जाणवायला लागलं आहे. ध्वनीप्रक्षेपण, ध्वनी मुद्रण यातील आश्चर्यकारक क्रांतीमुळे मैफलीचे स्वरूप बदलले आहे. संतूरसारख्या वाद्याचे नजाकतदार , अगदी सूक्ष्म आवाज शेवटच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचतात. चित्रपट गीतांच्या ध्वनी मुद्रणासाठी सगळे साजिंदे, गायक एकत्र असण्याची, सरावाची गरजही उरलेली नाही. मात्र याचा गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो असे काहींचे मत आहे.

विज्ञान तंत्रज्ञानाबरोबर दूरदर्शनच्या असंख्य वाहिन्या त्यावरील रिअ‍ॅॅलिटी शोसारखे कार्यक्रम, सोशल मीडियावरील संपर्क जाळ्यामुळे आता प्रसिद्धीची चटक वाढते आहे. अशा शोजमधून हल्ली गाणं कमी आणि जज, स्पर्धक, सूत्रसंचालकांची मजा-मस्ती, रुसवे-फुगवे, पोशाखांचा भपकेबाजपणा, कोणीही कुणाला तरी प्रपोज करणे, एखादा गंभीर प्रसंग तयार करून नसलेले अश्रु टिपणे असे प्रकारच जास्त असतात.

गुरुगृही राहून संगीत शिक्षण घेणं आता अनेक कारणांमुळं कमी झालं आहे. गुरुआज्ञेशिवाय जाहीर कार्यक्रम करायचे नाही वगैरे प्रकारही कालबाह्य झाल्यातच जमा आहेत. आपला पाल्य केव्हा एकदा स्टेज वर परफॉर्म करतोय आणि तो व्हिडिओ केव्हा अपलोड करून लाईक्स मिळवतोय याची पालकांनाच घाई असते. अर्थात जे संगीत शिकायला नव्हे कुठल्यातरी क्लासला जायचे म्हणून म्युझिक लर्न करायला जातात त्यांच्या बाबतीत हे प्रकार जास्त दिसतात. सिने संगीताच्या बाबतीत सुवर्णयुग संपल्याचं बोललं जातं. कारण शंभरात एखादं गाणं आता लक्षात राहील असं असतं. बाकी बहुतेक गाण्यांमध्ये ऑर्केस्ट्राचा अतिरेक, इंग्रजी, पंजाबी शब्द, पडद्यावर भडक हालचाली हेच सहसा आढळतं. शब्दांकडे लक्ष देणारे गायक अथवा संगीतकार आता विरळाच आढळतात. आशा भोसले यांनी मै बाजारों की नटखट रानी यातील बाजार शब्दाला आक्षेप घेतल्यामुळे त्या ऐवजी बहार शब्द घेण्यात आला असे किस्से आपण ऐकलेले आहेत. आता भीगे होंठ तेरे सारखी गाणी सर्रास लहान मुलं गातात, प्रेक्षकही टाळ्या पिटतात.

अशा परिस्थितीतही शंकर महादेवन, सोनू निगम, हरिहरन, ऋषिकेश रानडे सारखे अनेक गायक, संगीतकार दर्जा टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करीत आहेत. शास्त्रीय संगीतासाठी चॅनल्सवर जास्त वेळ दिला जावा असं त्यांना वाटतं. तबलावादक पंडित विजय घाटे सरोद वादक अमजद अली खा, पंडित हरिप्रसाद चौरासिया अशा दिग्गजांना नव्या पिढीकडून आशा आहेत. पूर्वीसारखं घरातून पळून जाऊन संगीत शिकण्याची वेळ आता बहुदा कुणावर येत नाही. तरुण पिढी करिअर म्हणून संगीताकडे बघू शकते / बघते आहे. आणि पालक परवानगी देत आहेत. सध्या बरेच कलाकार उच्च शिक्षित, तंत्रकुशल असतात. आर्थिक व्यवहाराच्या बाबत सजग असतात. ते मैफली रेकॉर्डिंग सांभाळून शिष्यांच्याही संपर्कात राहू शकतात. हल्ली गुरुशिष्याचं मित्रत्वाचं नातं आढळलं तरी आदर, प्रेम कायम आहेच, गुरुचं नाव घेताच कानाच्या पाळी जवळ हात जाणारे असंख्य शिष्य ही संगीत परंपरा सांभाळत आहेत.

– राधिका गोडबोले

(लेखिका प्रसिद्ध सतारवादक व संगीत अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या