नवी दिल्ली | New Delhi
मतदारसंघ पुनर्रचनेच्या संभाव्य दुष्परिणामांबाबत भारतात सर्वप्रथम आवाज उठवणारा पक्ष डीएमके हाच होता. सत्तेसाठी आपल्या तत्त्वांना तिलांजली देणाऱ्या निर्लज्ज आणि कृतघ्न लोकांनी हे समजून घेतले पाहिजे”, असे म्हणत तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबद्दल भूमिका मांडली. स्टॅलिन यांनी काही मागण्यांचा उल्लेख केला असून, तामिळनाडूच्या हितांशी आणि आपल्या तत्त्वांशी अजिबात तडजोड करणार नाही, असे म्हटले आहे.
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा आणि 2 डिसेंबर रोजी राज्यसभेचे कामकाज होणार आहे. यावेळी मतदारसंघ फेररचना विधेयक (Delimitation Bill) सादर करण्यात येईल, अशी चर्चा आहे. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी सरकार अनेक पक्षांशी चर्चा करत असून त्यांचे मन वळवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. तमिळनाडूतील एम. के. स्टॅलिन यांचा द्रमुक (DMK) डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे पण, त्यांच्या दोन अटी आहेत. भाजपसाठी द्रमुकचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ते द्रमुकच्या या दोन अटी मान्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाठिंब्यासाठी DMKच्या दोन प्रमुख अटी
Delimitation बिलाला DMK पाठिंबा देईल, अशी चर्चा सुरू असतानाच, पक्ष अजूनही त्यांच्या भूमिकेचा विचार करत आहे, असे कळते. त्यांच्या मागण्यांचा समावेश या कायद्यात केला जाईल का, याबाबत पक्षाला चिंता आहे. द्रमुकने अद्याप डीलिमिटेटश विधेयकाचा मसुदा पाहिलेला नाही आणि जोपर्यंत त्यातील तरतुदींचा अभ्यास केला जात नाही तोपर्यंत पाठिंबा देण्याचे वचन देणार नाही, असे पक्षाने म्हटले आहे. भाजप एका मुख्य मागणीवर तत्त्वतः सहमत झाला असला, तरी दुसरी मागणी पूर्ण करण्याबाबत सरकार हमी देऊ शकेल, याची द्रमुकला खात्री वाटत नाही. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी द्रमुकच्या दोन अटी आहेत. पहिली अट म्हणजे आताची डीलिमिटेशन प्रक्रिया झाल्यानंतर पुढील 25 वर्षांसाठी ही प्रक्रिया गोठवावी आणि दुसरी अट म्हणजे सर्व राज्यांमधील लोकसभा जागांच्या संख्येत 50 टक्क्यांनी समान वाढ केली जावी.
एम के स्टॅलिन काय म्हणाले?
एमके स्टॅलिन म्हणाले की, “मतदारसंघ पुनर्रचनेमुळे होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांबाबत भारतात सर्वप्रथम आवाज उठवणारा पक्ष डीएमके हाच होता. न्याय्य मतदारसंघ पुनर्रचनेची मागणी करण्यासाठी देशभरातील नेत्यांना एकत्र आणणारी पहिली बैठकही चेन्नईतच पार पडली होती.” “तमिळनाडू विधानसभेत मंजूर झालेला ठराव आणि न्याय्य मतदारसंघ पुनर्रचनेसाठी स्थापन झालेल्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत संमत झालेल्या ठरावांना अनुसरून आमच्या ठाम मागण्या होत्या”, असे स्टॅलिन म्हणाले.
“लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवण्यात आली, तरी कोणत्याही परिस्थितीत तमिळनाडूचा सध्याचा ७.१८ टक्के वाटा कमी होता कामा नये! १९७१ च्या जनगणनेच्या आधारे निश्चित केलेले आणि यापूर्वी गोठवलेले राज्यांमधील संसदीय प्रतिनिधित्वाचे विद्यमान प्रमाण पुढील २५ वर्षांसाठी कायम ठेवले पाहिजे!”, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही आणि तडजोडीचा तर प्रश्नच उद्भवत नाही!
“डीएमके आजही या दोन्ही भूमिकांवर ठाम आहे आणि पुढेही राहील. या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही आणि तडजोडीचा तर प्रश्नच उद्भवत नाही! प्रसारमाध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि विश्वासघातकी लोकांची कुणकुण आमची भूमिका कोणत्याही प्रकारे डळमळीत करू शकणार नाही”, असेही स्टॅलिन म्हणाले आहेत.
“सत्तेतील पदांसाठी आपल्या तत्त्वांना तिलांजली देणाऱ्या निर्लज्ज आणि कृतघ्न लोकांनी हे समजून घेतले पाहिजे. डीएमके तमिळनाडूच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही, आणि आपल्या तत्त्वांना कधीही तिलांजली देणार नाही”, असेही स्टॅलिन यांनी म्हटले आहे.




