नाशिक | प्रतिनिधी
शहरातील बहुचर्चित डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणाच्या (Dr. Manisha Jejurkar Suicide Case) कायदेशीर लढाईला वेग आला असून, हा खटला आता नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाकडे (Nashik District Session Court) वर्ग करण्यात आला आहे. नाशिकचे दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांनी यासंदर्भातील आदेश पारित केले आहेत.
या खटल्याशी संबंधित जप्त केलेला सर्व मुद्देमाल येत्या १ डिसेंबर पूर्वी सत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने गंगापूर पोलिसांना दिले आहेत. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) सहकलम ३ (५) अन्वये दाखल असलेल्या या गुन्ह्याची सुनावणी सत्र न्यायालयातच चालवली जाऊ शकते. त्यामुळे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम २३० नुसार संशयितांना दोषारोप पत्र व इतर कागदपत्रांच्या प्रती सुपूर्द केल्यानंतर हे प्रकरण रितसर सत्र न्यायालयाकडे पाठवले आहे. या प्रक्रियेमुळे आता या हाय-प्रोफाईल खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
डिजिटल मुद्देमालावर मदार
न्यायालयाने १ डिसेंबरपर्यंत सर्व जप्त केलेला मुद्देमाल सत्र न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिल्याने तपासादरम्यान पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही संशयित डॉक्टरांचे मोबाईल फोन, त्यातील चॅटिंग, कॉल रेकॉर्ड्स आणि फॉरेन्सिक अहवाल जप्त केले आहेत. सत्र न्यायालयात सुरू होणाऱ्या खटल्यात हेच तांत्रिक व डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब गुन्हा सिद्ध करण्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.




