नाशिक | प्रतिनिधी
आर्थिक व्यवहारातील परताव्याचे कारण पुढे करत एका महिलेला लॉज व राहत्या घरी बोलवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची तसेच तिच्या १० वर्षीय मुलीशी अश्लील वर्तन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नाशिकरोड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक देवाणघेवाणीच्या नावाखालील उभारलेला ब्लॅकमेलिंगचा सापळा आणि बालसुरक्षेचा प्रश्न या घटनेतून समोर आला आहे.
नाशिकरोड पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार २० सप्टेंबर ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घडला आहे. फिर्यादी महिलेने वेळोवेळी दिलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने संशयित विकी शिराळ (वय २८, रा. विहीतगाव, नाशिकरोड) याने फिर्यादीस साई शक्ती लॉज, नाशिकरोड येथे बोलावले. तेथे फिर्यादीचे व त्याचे फोटो वडिलांना व भावाला दाखवून धमकी देत तिच्याशी शारीरिक संबंध केले. यानंतरही धमकावून फिर्यादीच्या घरी तसेच स्वतःच्या राहत्या घरी नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे शिराळने अल्पवयीन मुलीची सुरक्षितता धोक्यात आणली. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादी घरी नसल्याचे पाहून शिराळने पीडितेच्या १० वर्षीय मुलीशी अश्लिल कृत्य केले. मुलगी रडू लागल्याने संशयित तेथून पळून गेला. याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता, त्याने तुझ्यासोबत केले तसेच तुझ्या मुलीसोबत करणार होतो, पण ती रडायला लागल्याने निघून गेलो असे निर्लज्जपणे सांगितले. तसेच, ही बाब कोणाला सांगितल्यास मुलीला शाळेतून गायब करून मारून टाकण्याची धमकीही दिली. तर, १८ नोव्हेंबर रोजी पुन्हा पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून अत्याचार करत, हा प्रकार पतीला सांगितल्यास पतीला पुन्हा गुन्ह्यात अडकवीन, अशी धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ब्लॅकमेलिंगची पद्धत
उधारी किंवा गुंतवणुकीचे पैसे परत देण्याच्या नावाखाली पीडितेला एकांतात बोलावणे, संभाव्य फोटोंचा वापर करून सामाजिक बदनामीची भीती दाखवणे आणि पतीला पुन्हा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे ही संशयिताची दबावनीती दिसून आली आहे. आर्थिक व्यवहारातील असुरक्षिततेचा फायदा घेत लैंगिक शोषणाचा हा प्रकार तपासात समोर येणार आहे.




