शिरूर |वार्ताहर| Shirur
पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणीला शिरूरमधील एका लॉजिंगमध्ये नेण्यात आले. तिथे तिला नशेचा पदार्थ देऊन सलग तीन दिवस सात जणांनी तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयितांनी कट रचून एका तरुणीचा विश्वास संपादन केला. तिला आकर्षक पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. या आमिषाला बळी पाडून तिला एका चारचाकी कारमधून शिरूर शहरातील एका लॉजवर नेण्यात आले. लॉजिंगवर पोहोचल्यानंतर आरोपींनी तिला एक संशयास्पद पांढर्या रंगाची नशायुक्त पावडर जबरदस्ती खायला दिली. या नशेत तरुणीची प्रकृती खालावल्यानंतर, बुधवार (19 ऑगस्ट) ते शुक्रवार (21 ऑगस्ट) या सलग तीन दिवसांच्या कालावधीत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण शिरूर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तरुणीने हिंमत दाखवून पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर, शिरूर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे वेगाने वेगाने फिरवली आहेत. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नकाते या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत. या प्रकरणात एक़ आरोपी शिरूर, चौघे श्रीगोंदा तालुक्यातील तर दोन जण पारनेर तालुक्यातील आहेत. सर्व संशयित आरोपी सध्या फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. नोकरीच्या नावाखाली होणार्या अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे आणि महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.




