Monday, January 26, 2026
Homeदेश विदेशTariff War: ट्रम्पची आता थेट चीनला धमकी; म्हणाले, "माझ्याकडे काही हुकुमी पत्ते...

Tariff War: ट्रम्पची आता थेट चीनला धमकी; म्हणाले, “माझ्याकडे काही हुकुमी पत्ते आहेत, पण…”

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. हा अतिरिक्त कर अमेरिकेकडून २७ ऑगस्टपासून लागू केला जाणार आहे. काही तासांनी हा अतिरिक्त कर लागू होईल. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. टॅरिफवरुन अमेरिकेचा चीनबरोबर देखील संघर्ष सुरु आहे. अशातच ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले, “माझ्याकडे काही हुकुमी पत्ते आहेत, पण मला ते बाहेर काढायचे नाहीत.” त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचे शब्द सावरले आणि म्हणाले की “चीन व अमेरिकेची चांगली मैत्री आहे. ही मैत्री पुढे जात आहे.” दरम्यान, भारत व चीनची वाढत असलेली मैत्री ट्रम्प यांना खटकत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरुन दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबद्दल एक मोठे विधान केले आहे. बदलती जागतिक समीकरणे अमेरिकेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे ट्रम्प यांनी थेट चीनला धमकी दिली. आपल्या निर्णयांमुळे चीनवर गंभीर परिणाम होऊ शकतो पण चांगल्या संबंधांसाठी त्यांचा वापर न करण्याचा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

- Advertisement -

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी संध्याकाळी (२५ ऑगस्ट) वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “अमेरिका चीनशी चांगले संबंध निर्माण करणार आहे. चीनशी आमचे संबंध उत्तम असतील. त्यांच्याकडे (चीन) काही पत्ते आहेत. आमचेही अविश्वसनीय असे पत्ते आहेत. पण मला ते पत्ते खेळायचे नाहीत. जर मी ते पत्ते खेळलो तर ते चीनला उद्ध्वस्त करतील. मी हे पत्ते खेळणार नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ट्रम्प हे बोलत असताना दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग त्यांच्या शेजारी बसले होते.

YouTube video player

डोनाल्ड ट्र्म्प यांनी आधी चीन आणि आता भारताविरोधात टॅरिफचे अस्त्र उगारले आहे. यामुळे दोन्ही देशांच्या भांडवली बाजारांमध्ये काही दिवस उलथापालथ झाली खरी मात्र, दोन्ही देशांचे भांडवली बाजारात आता स्थिर आहेत. अशातच, भारत व चीनमधील जवळीक वाढू लागली आहे. चीनने भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. भारतानेही त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे.

चीनने अमेरिकेला मॅग्नेट दिले नाही, तर २०० टक्के टॅरिफ लागू शकतो, असे संकेत ट्रम्पनी दिले. मॅग्नेटचा वापर ऑटोमोटिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिफेंस इंडस्ट्रीमध्ये होतो. खरे म्हणजे चीनसाठी अमेरिका आणि अमेरिकेसाठी चीन एक मोठी बाजारपेठ आहे. टॅरिफ वॉरमध्ये दोन्ही देशांच नुकसान आहे. खरे म्हणजे ट्रम्प यांनी आधी चीनवर मोठा भरभक्कम टॅरिफ लावला होता. चीनने सुद्धा प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सामानावर टॅरिफ तितकाच वाढवला. त्यात अमेरिकेच नुकसान झाले.

आज चीनची रेअर अर्थ मिनरल म्हणजे दुर्मिळ खनिजाच्या बाजारापेठेवर मोठी मक्तेदारी आहे. जगात कुठलाही देश रेअर अर्थ मिनरलच्या बाबतीत चीनला आव्हान देऊ शकत नाही. रेअर अर्थ मिनरल बाहेर काढणं ही एक महागडी आणि हायटेक प्रोसेस आहे. मोबाइल, इलेक्ट्रीक कार्स, फायटर जेट्स आणि अन्य उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सगळ्या जगाला रेअर अर्थ मिनरलची आवश्यकता आहे.

दरम्यान, भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याला ट्रम्प यांचा विरोध आहे. त्यामुळेच त्यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादलं आहे. मात्र, रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या, रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या चीनबाबत अमेरिकेा काहीशी मवाळ धोरण अवलंबत असल्याचं दिसत आहे. चीन हा रशियन तेलाचा सर्वात मोठा ग्राहक असूनही अमेरिकेने त्यावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या