Thursday, May 2, 2024
Homeधुळेसीआयडीचा तपास अंतिम टप्प्यात

सीआयडीचा तपास अंतिम टप्प्यात

दोंडाईचा – Dondaicha – वि.प्र :

येथील मोहन मराठे मृत्यूप्रकरणी सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. नुकताच मराठे याचा शवविच्छेदन अहवाल तहसीलदारांकडून सीआयडीला प्राप्त झाला आहे.

- Advertisement -

त्यामुळे तपास अंतिम टप्प्याकडे आला असून या आठवड्यात कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नगरसेवक गिरधारीलाल रूपचंदानी यांच्या मालकीच्या मुकेश ऑईल मिल व कैलास ट्रेडर्सच्या गोदामातून तांदुळाचे कट्टे चोरीला गेले होते.

याबाबत त्यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी तपासाला वेग देत तीन जणांना अटक केली होती.

संशयित मोहन मराठे याला 7 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते. मात्र त्याच दिवशी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान मराठे यांचा मृतदेह रामी रस्त्यावर आढळून आला होता.

यामुळे मराठे यांच्या कुटुंबीयांकडून पोलिसांवर संशय व्यक्त केला गेला. तसेच मृतदेहाचे शवविच्छेदन मॅजिस्ट्रेट यांच्या उपस्थितीत इन कॅमेर्‍यात करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रकरणाने गंभीर वळण घेतल्यामुळे तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.

नाशिक सीआयडीचे पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे हे दि. 9 ऑक्टोबरला सकाळीच आपल्या पथकासह दोंडाईचा दाखल झाले. पहाटे चार वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांची धुळे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. तर सायबर सेलमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अनिल कोंकरे यांची नियुक्ती करण्यात आली.

मयत मराठे यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह पोलिस ठाण्यात आणण्यात आला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी चर्चेसाठी शिष्टमंडळाला पाचारण केले होते. याचवेळी पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, ठाणे अंमलदार प्रमोद चौधरी, बिट हवालदार वासुदेव जगदाळे यांना निलंबित करण्यात आले.

सीआयडीचे नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके कार्यरत झाले. सीआयडीने मयत मराठे यांची आई, पत्नी व त्या दिवशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सर्व पोलिस कर्मचार्‍यांची कसून चौकशी केली. फिर्यादीसह घटनेतील तिन्ही आरोपींची देखील सीआयडीने चौकशी केली आहे. मयताचे मामा, शेजारी, मयतास मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते यांची देखील चौकशी करून जबाब नोंदविले आहेत.

दोंडाईचा न्यायालयात देखील मोहन मराठे याच्या मृत्यूचे चौकशीकामी मराठे यांची आई ,पत्नी, अशोक मराठे आणि वेडु चव्हाण यांची न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्यासमोर साक्ष घेण्यात आली आहे.

मृत मोहन यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालची प्रतीक्षा सीआयडीला होती. मात्र हा अहवाल तहसीलदारांकडून सीआयडीला प्राप्त झाला आहे. म्हणूनच सीआयडीचा तपास अंतिम टप्प्याकडे आला असून याबाबत या आठवड्यात कारवाई होण्याची शक्यता सूत्रांकडून प्राप्त होत आहे.

लवकरच सत्य जनतेसमोर येईल

घटनेला अठरा दिवस उलटले आहेत. आता सीआयडीकडे मृत मराठे याच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार मृताच्या शरीरावर असणार्‍या जखमा, खुणा या बाबत देखील क्युरीज काढून त्याची पडताळणी केली जाणार असल्याने या आठवड्यापर्यंत घटनेचे सत्य जनतेसमोर येईल, असे सीआयडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविकिरण दरवडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या