Saturday, May 18, 2024
Homeनाशिकपक्ष्यांसारखे ५४ किमी ताशी वेगाने स्थलांतर करतो 'पतंग' कीटक - डॉ.सचिन...

पक्ष्यांसारखे ५४ किमी ताशी वेगाने स्थलांतर करतो ‘पतंग’ कीटक – डॉ.सचिन गुरुळे

नाशिक | Nashik

महाराष्ट्रातून जाणाऱ्या जैवविविधतेने नटलेल्या वेस्टर्न घाटात आठशे जातीचे पतंग कीटक आढळले असून जगभरात फुलपाखराच्या पंधरा हजार जाती आहे. तर पतंगाच्या तब्बल १ लाख ८५ हजार जाती आहेत. भारतात बारा हजार जाती असून त्याचा अभ्यास ब्रिटिशांनी केला आहे. इंग्रजांनी या कीटकाच्या बारा हजार जाती शोधल्या. त्याच्यातील ७८९ जाती या महाराष्ट्रातील आहेत. इंग्लंडमधील म्युझियम मध्ये हे कीटक आजही बघायला मिळतात. इंग्रज भारत सोडून गेल्यानंतर या कीटकांचा अभ्यास पाहिजे तसा झाला नसल्याची खंत कीटक अभ्यासक डॉ.सचिन गुरुळे यांनी नेचर क्लब ऑफ नाशिक व नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निसर्ग कट्यावर ‘पतंग किटकाचे अनोखे विश्व’ या विषयावर संवाद साधतांना केले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा.आनंद बोरा, वनरक्षक संदीप काळे,आशा वानखेडे,अमोल दराडे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, परदेशातून ज्याप्रमाणे पक्षी स्थलांतर करतात त्याप्रमाणे हॉकमॉथ हा पतंग कीटक देखील पक्ष्यांसारखे ५४ किमी ताशी वेगाने स्थलांतर करीत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. रात्रीच्या वेळी दिव्याकडे आकर्षित होणारा एक कीटक म्हणजे फुलपाखराचा मोठा भाऊ ‘मॉथ’ त्याला मराठीमध्ये पतंग देखील म्हणतात. पतंगांचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील खवलेपंखी (लेपिडोप्टेरा) गणात होतो. त्यांना काही वेळा पाखरू किंवा पाकोळी असेही म्हटले जाते.

पतंग आणि फुलपाखरे एकमेकांना जवळचे असून ते एकाच गणातील आहेत. महाराष्ट्रात पतंगांची विविधता आणि संख्या फुलपाखरांच्या तुलनेत जास्त आहे. बहुतेक पतंग निशाचर आहेत. मात्र, त्यांच्या काही जाती दिनचर तर काही दिननिशाचर आहेत. वटवाघळाचे मुख्य खाद्य हे मॉथ आहे. हे कीटक चंद्रप्रकाशाचा उपयोग नेव्हिगेशन म्हणून करतात. यामुळेच बल्ब समोर हे मॉथ नेहमी दिसतात. त्यांना तो चंद्र वाटत असल्याने ते त्याच्या आजूबाजूला फिरताना दिसतात, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, या किटकाची अळी विषारी असते तसेच ९० टक्के मॉथ या जमिनीत कोश करतात. पतंगाचे आयुष्य हे सात ते पंधरा दिवसांचे असते. मादी नरा पेक्षा जास्त दिवस जगते. विशेष म्हणजे हे पतंग चक्क फुलपाखराची मिमिक्री करतात. या कीटकअळी भाजीपाला फस्त करत असल्याने अनेकवेळा शेतकरी मोठ्या प्रमाणात कीटक नाशके मारतो. तसे न करता शेतात हेलोजन दिवा आणि पांढरे कापड लावून जमिनीवर रॉकेल टाकल्यासही कीड नियंत्रणात येत असल्याचे देखील डॉ.गुरुळे यांनी म्हटले.

तसेच गेल्या दोन वर्षापासून अनियमित पडत असणाऱ्या पावसामुळे या किटकाचे जीवनचक्र बदलत असल्याचे दिसून आले असून यांचा प्रजनन काळ हा मार्च ते जून असताना तो आता पुढे दोन महिने सरकला गेला असल्याचे अभ्यासात पुढे आले असल्याचेही गुरुळे यांनी सांगितले. तसेच स्वागत वनरक्षक संदीप काळे यांनी तर प्रास्ताविक प्रा.आनंद बोरा आणि आभार गंगाधर आघाव यांनी मांडले. यावेळी कार्यक्रमास पक्षिमित्र चंद्रकांत दुसाने, भीमराव राजोळे, रवींद्र वामनाचार्य, राजेंद्र तोडकर, डॉ.संध्या तोडकर, पंकज चव्हाण, विकास गारे, रोहित मोगल, रोषण पोटे, प्रमोद पाटील, गणेश वाघ, केशव नाईकवाडे, राहुल वडघुले आदींसह पक्षिमित्र उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या