अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
‘जलजीवन मिशन’ मधील पाणी योजनांच्या कामांचे, सर्वेक्षणापासून ते ठेकेदार नियुक्तीपर्यंतची कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली आहेत. त्यांनी बसवलेल्या लोकांकडून कामे करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आहे. कर्जत-जामखेडमधील ठेकेदाराचे आ.रोहित पवार व पारनेरमधील ठेकेदाराचे खा. नीलेश लंके यांच्याशी लागेबांधे आहेत, असा थेट आरोप भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे.
डॉ.विखे अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथील कार्यक्रमास उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवार व लंके यांच्यावर आरोप केला. नगर जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधील पाणी योजनांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खा. लंके यांनी संसदेत केली होती. तसे निवेदन संबंधित मंत्र्यांना दिले होते. केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील काही कामांची चौकशीही केली. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे बोलत होते. डॉ. विखे म्हणाले, आरोप करणारे जर सायंकाळी ठेकेदाराला बोलून घेत असतील तर त्यातील वास्तविकता तपासली पाहिजे.
जलजीवन मिशनमधील सर्व कामांचे सर्वेक्षण, त्याच्या निविदा, ठेकेदार नियुक्ती अशी सर्व कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली आहेत. कार्यारंभ आदेश निघाल्यानंतर सरकार बदलले. मात्र, त्यावेळी सरकारने बसवलेल्या लोकांकडूनच कामे करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आहे, अशी टीकाही डॉ. सुजय विखे यांनी केली.
ठाकरे सेनेतून बाहेर पडण्यासाठी भांडण
छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये वाद-विवाद सुरू आहेत. खैरे यांनी दानवे यांच्या विरोधात मातोश्रीवर तक्रार केली आहे. यासंदर्भात सुजय विखे म्हणाले, दोघांना ठाकरे यांच्या सेनेतून बाहेर पडून कुठेतरी जायचे असेल, म्हणून ते भांडण करत आहेत. ठाकरेंच्या सेनेतील नाराजी आता फॅशन झाली आहे. तक्रार करून उपयोग काय ? कारण मातोश्रीवर ऐकायला तरी कोण आहे ? आता मातोश्री, संजय राऊत यांच्या कार्यपध्दतीत एवढ्या वर्षानंतर बदल झालेला नाही. त्यामुळे मातोश्रीवर तक्रार करूनही काय होणार? त्यामुळे ज्यांना चांगल्या नेतृत्वाकडे जायचे असेल ते लोक प्रसारमाध्यमातून भांडण दाखवत आहेत आणि बाहेर पडणार आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.