शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
संपूर्ण देश शिर्डीत येऊन फुकट जेवण करतो. देशभरातील भिकारी या ठिकाणी येतात. हे योग्य नाही. साई संस्थानच्या प्रसादलयात मोफत भोजन प्रसाद दिला जातो. तो प्रसाद 25 रुपये केला पाहिजे. मोफत देण्याची गरज नाही. अन्नदानातून मिळणारा पैसा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वापरण्यात यावा. भाविकांच्या देणगीतून येणारा पैसा संस्थानने साईभक्त आणि शिर्डी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने खर्च केला पाहिजे. असे न झाल्यास या प्रश्नासाठी आंदोलन करु, असा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
शनिवारी सायंकाळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथे 13 फेब्रुवारी रोजी होणार्या परिक्रमा कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत हजेरी लावली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर देखील उपस्थित असल्याने या संधीचा फायदा घेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत संस्थानमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, साईबाबा संस्थाने 288 कोटीचे शैक्षणिक संकुल बांधले. त्यामध्ये ऑडिटोरियम, मोठमोठे स्क्रीन व इतर गोष्टींचा झगमगाट असून शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षक मिळत नसेल तर या शैक्षणिक संकुलाचा फायदा काय? संस्थानच्या माध्यमातून सध्या जो खर्च सुरू आहे तो अशा माध्यमातून हवा की त्या खर्चाची परतफेड या भूमीमध्ये जन्मलेल्या माणसाच्या उपजीविकेचे साधन होणे गरजेचे आहे. संस्थानने हॉस्पिटल बांधायचा निर्णय घेतला. हॉस्पिटल तुम्ही बांधू शकता.
परंतु ती आज शिर्डीकरांची गरज नाही. त्यापेक्षा याठिकाणी एवढे मोठे शैक्षणिक संकुल बांधले त्याठिकाणी अकरावी व बारावी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तज्ञ शिक्षकांची नेमणूक करून या ठिकाणी कोचिंग क्लासेस सुरू करणे गरजेचे आहे. साई संस्थानमध्ये शिकणारा विद्यार्थी हा एंट्रन्स परीक्षेत पास झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. संस्थानने दवाखाना उघडला परंतु तिथे फक्त 25 टक्के स्थानिक लोक लाभ घेतात. बाकी 75 टक्के लोक बाहेरगावचे आहेत. त्यांना आजार बरा होण्याकरिता साहित्य मिळते आमची अडचण नाही. याने शिर्डी ग्रामस्थांचे जीवनमान बदलते किंवा त्यांना यातून काही फायदा होतो असे काही नाही. साईभक्तांना फायदा मिळणे व शिर्डीतील अर्थकारण गतिमान करणे, शिर्डी ग्रामस्थांच्या मुलांचे भविष्य घडवणे हा संस्थानचा मुख्य हेतू असला पाहिजे.
प्रसादलयात मोफत जेवण दिले जाते. ते 25 रुपये करणे गरजेचे आहे. अन्नदानातून मिळणार्या पैशातून शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खर्च करा. संपूर्ण देश याठिकाणी येऊन फुकट जेवण करतो. विविध राज्यातील भिकारी याठिकाणी येतात. हे काही योग्य नाही. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जी शासनाची जमीन संस्थानला दिली त्या ठिकाणी वर्षभरात आयपीएल सुरू कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करणार असून एक आयपीएल सामना याठिकाणी झाला तर शिर्डीची अर्थव्यवस्था बदलून टाकेल. जेवढी जबाबदारी साईबाबा संस्थान साईभक्तांची घेतात तेवढीच जबाबदारी संस्थानने ग्रामस्थांची घेतली पाहिजे. संस्थानने निर्णय घेताना तालुक्याचा विकास कसा होईल हे मूळ उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. नुसत्या मोठ्या इमारत बांधून काही फायदा नाही. शैक्षणिक संकुलाला दर्जेदार शिक्षक देणे गरजेचे आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्याला उत्कृष्ट इंग्लिश बोलता आले पाहिजे.
गुणवत्तेवर शिकवा, झाडाखाली शिकवा परंतु शिक्षण दर्जेदार द्या. तरच मुले घडतील. मुलांच्या भविष्याच्या प्रश्नासाठी शिर्डीत कुठल्याही पक्षाचा राजकीय नेता या कामासाठी विरोध करणार नाही ही आम्हाला खात्री आहे. शिर्डीच्या शैक्षणिक संकुलात सीबीएससी व इंग्लिश मीडियम माध्यमातूनच शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षणाला फार महत्त्व आहे. जो शिकेल तोच पुढे जाऊ शकेल व शिक्षणातून मिळणार्या ज्ञानातून शिर्डीची प्रगती होईल, शहर सुरक्षित राहील. लवकरच नामदार विखे पाटील यांच्या उपस्थितीत साई संस्थान सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून शिर्डी ग्रामस्थ व साईबाबांच्या हितासाठी संस्थान प्रशासनाने क्रिकेट स्टेडियम विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे. येणार्या काळात शिर्डीत मोठे बदल दिसेल. लवकरच एमआयडीसी सुरू होणार असून विविध प्रकल्प देखील लवकरच मार्गी लागणार असल्याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.