Friday, May 3, 2024
Homeनगर‘डॉ.तनपुरे’च्या कामगारांचे थकीत वेतनासाठी बेमुदत उपोषण सुरू

‘डॉ.तनपुरे’च्या कामगारांचे थकीत वेतनासाठी बेमुदत उपोषण सुरू

दोनशे कामगारांचा उपोषणात सहभाग; कामगारांवर उपासमारीची वेळ

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर)- डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे साखर कारखान्याच्या कायम, हंगामी व निवृत्त दोनशे कामगारांनी आपल्या थकीत पगार व इतर देयके मिळण्यासाठी काल (दि.17) सकाळी दहापासून राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

- Advertisement -

दि.1 ऑगस्ट 2017 ते 30 नोव्हेंबर 2019 दरम्यानच्या मासिक वेतनाचे नऊ कोटी, भविष्यनिर्वाह निधीचे अडीच कोटी, निवृत्त कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीचे सहा कोटी रुपये देणे बाकी आहे. हे थकीत साडेसतरा कोटी रुपये अदा करावेत. चालू सन 2019-2020 चा गाळप हंगाम कारखान्याने उसाअभावी बंद ठेवला आहे. त्यामुळे कामगारांना एक वर्षासाठी ले-ऑफ दिला आहे. परंतु कारखाना व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यात ले-ऑफचा कायदेशीर करार झालेला नाही. ले-ऑफचा करार करावा, अशा कामगारांच्या मागण्या आहेत.

कारखाना सुरू झाल्यानंतर परिवर्तन मंडळाने कामगारांना केवळ अत्यल्प अग्रीम देऊन काम करून घेतले. कारखाना सुरू असताना पद्मश्री डॉ.विखे कारखाना व गणेश कारखान्याचे कामगार आणून त्यांना पूर्ण पगार व ग्रॅच्युईटी फंड देण्यात आले. सत्ताधारी संचालक मंडळाने सत्ता घेतल्यापासून कामगारांचे 17.50 कोटी रुपये थकविले आहेत.

डॉ. तनपुरे कारखान्याची सत्ता मिळण्यापूर्वी खा. डॉ. सुजय विखे यांनी कामगार व सभासदांना 100 कोटी रुपये उपलब्ध करीत कारखान्याचे सभासद व कामगारांची देणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवत परिवर्तन मंडळाला कारखान्यामध्ये एकहाती सत्ता दिली. सत्ताधारी परिवर्तन मंडळाने सन 2017-18 व सन 2018-19 साली कारखान्याचा गाळप हंगाम सुरू केला. त्यासाठी कामगारांनी मोलाची साथ दिली.

कामगारांना सत्ताधारी परिवर्तन मंडळाने अत्यल्प अग्रीम देऊन काम करून घेतले. कामगारांनी दि. 1 ऑगस्ट 2017 पासून ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत अत्यंत प्रमाणिकपणे काम केले. कामगारांना या काळात अत्यल्प अग्रीम देण्यात आले. त्याउलट या काळात गणेश कारखाना व पद्मश्री डॉ. विखे कारखान्याच्या कामगारांनी तनपुरे कारखान्यामध्ये काम केले. त्या कामगारांचे वेतन व प्रॉव्हिडंट फंडासह अदा करण्यात आले.

परंतु तनपुरे कारखान्याच्या कामगारांचे वेतन व प्रॉव्हिडंट फंड देण्यात आले नाही. तसेच सेवानिवृत्त कामगारांचेही प्रॉव्हिडंट फंड जमा करण्यात आले नाहीत. खा. डॉ. सुजय विखे यांच्या काळातील कामगारांचे वेतन 9कोटी रुपये, त्यावरील प्रॉव्हिडंट फंड 2.5 कोटी व सेवानिवृत्त कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड रक्कम 6 कोटी असे एकूण 17.50 कोटी रुपये थकीत झाले असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे.

दोन वर्ष काम करूनही कामगारांना देयक मिळत नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातच संचालक मंडळाने सन 2019-20 चा गळीत हंगाम बंद ठेवत कामगारांना ले ऑफ देण्याचा निर्णय घेतला. कार्यकारी संचालक यांच्या तोंडी आदेशाने फलकावर ले-ऑफची माहिती ऐन दिवाळी सणापूर्वी देण्यात आली. यामुळे कामगारांची काळी दिवाळी साजरी झाली.

या सर्व बाबीचे निवेदन जिल्हाधिकारी, खा. सुजय विखे, चेअरमन, संचालक मंडळ यांना देऊनही संबंधितांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने आम्ही हे उपोषण सुरू केले आहे. आमच्या मागण्या त्वरीत मान्य न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कामगार नेते सुरेश थोरात यांनी दिला आहे.

कामगारांनी आपल्या न्याय्य मागण्यासाठी सुरू केलेल्या उपोषणाला देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पाठिंबा दर्शवित कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले आहे. उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, माजी नगरसेवक अमोल कदम यांनी उपोषणस्थळी श्रीछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सत्यजित कदम यांच्यावतीने कामगारांना पाठिंबा जाहीर केला.

खासदार डॉ. सुजय विखे, चेअरमन व संचालक मंडळाची कामगारांनी वेळोवेळी भेट घेतली. परंतु खा. डॉ. विखे व सत्ताधारी संचालक मंडळाने कामगारांकडे दुर्लक्ष केले. सत्ताधारी संचालक मंडळ कामगारांचे वेतन थकविण्याचे षडयंत्र रचत उलट संचालक मंडळाचे राजीनामे देण्याची भाषा वापरण्यात आली असल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या