राहाता |प्रतिनिधी| Rahata
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात साडेआठ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी आजी-माजी संचालक, साखर आयुक्त पुणे, संबंधित दोन बँकांचे अधिकारी अशा एकूण 54 जणांवर लोणी पोलीस ठाण्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणीचे सहा. पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली.
विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सन 2004 ते 2006 या गळीत हंगामामध्ये सभासद शेतकर्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून एकूण 8 कोटी 86 लाख 12 हजार 206 बेसल डोस कर्ज काढले. त्यानंतर सन 2007 मध्ये झालेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ प्राप्त करून घेत आर्थिक अफरातफर केल्याचे व शासनाची फसवणूक केल्याची तक्रार बाळासाहेब केरुनाथ विखे (रा.लोणी बुद्रुक, ता. राहाता) यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व आहे. सन 2004-2005 व 2005-2006 मध्ये बनावट कागदपत्रे करून बेसल डोस कर्जाचा प्रस्ताव तयार करून सदर प्रस्ताव युनियन बँक व बँक ऑफ इंडिया झोनल ऑफीस पुणे यांच्याकडून अधिकार्यांशी संगनमत करून अनुक्रमे 3 कोटी 11 लाख 60 हजार 986 व 5 कोटी 74 लाख 42 हजार 220 रुपये कर्ज मंजूर करून घेतले. परंतु शेतकरी सभासदांच्या नावे कर्ज मंजूर केले असले तरी प्रत्यक्षात सदर कर्जाची रक्कम सभासद शेतकर्यांना देण्यात आली नाही. सदर रकमेचा बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळविला.
शासनाची फसवणूक करुन कर्जमाफी योजनेस पात्र नसतानाही कर्जमाफी प्राप्त करून फौजदारी स्वरुपाचा गुन्हा केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर कारखान्याच्या संचालक मंडळाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने दि. 18 मार्च 2025 रोजी राहाता कोर्टाने यापूर्वी दिलेल्या निर्णय कायम ठेवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
सर्वोच्च न्यायालयाचे देलेल्या आदेशानुसार लोणी पोलीस ठाण्यात अण्णासाहेब मुरलीधर कडू, अण्णासाहेब सारंगधर म्हस्के, विठ्ठल मारुतराव गायकवाड, विजय शाळीग्राम चंतुरे, रामभाऊ शंकरराव भुसाळ, गोपिनाथ गेणुजी ढमक, लक्ष्मण पुंजाजी पुलाटे, भाऊसाहेब बाबुराव घोलप, आप्पासाहेब कारभारी दिघे, कारभारी भाऊसाहेब आहेर, भास्करराव निवृत्ती खर्डे, दत्तात्रय साहेबराव खर्डे, अशोक विठ्ठल निबे, तुकाराम नामदेव बेंद्रे, सखाहरी पुंजाजी देठे, बाळासाहेब भगवत आहेर, सारंगधर नामदेव दुशिंग, राधाकृष्ण एकनाथराव विखे, दीपक गोरक्षनाथ पाटील, संपत भाऊराव चितळकर, पार्वताबाई लक्ष्मण तांबे, पद्मा प्रतापराव कडू, भामाबाई राधाकृष्ण काळे, सदाशिव कारभारी गोल्हार पाटील, प्रभाकर पांडुरंग निघुते, विठ्ठलराव गंगाधर मांढरे, बापूसाहेब बाबासाहेब घोलप, धोंडीबा विठोबा पुलाटे, गंगाभीषण भिकचंद आसावा, विश्वासराय केशवराय कडू, आबासाहेब ऊर्फ शशिकांत लक्ष्मण घोलप, शांतीनाथ एकनाथ आहेर, सखाहरी नाथ मगर, काशिनाथ मुरलीधर विखे, सर्जेराव सोन्याबापू खर्डे, सुभाष बाळकृष्ण खर्डे, केरूनाथ संभाजी चेचरे, काकासाहेब सोपानराब म्हस्के, बन्सी बाळू तांबे, बाबासाहेब किसन लोहाटे, सतीश शिवाजी ससाणे, बाळासाहेब बापूजी पारखे, लक्ष्मीबाई नारायण कहार, मथुराबाई सोपानराव दिघे, केशरबाई ऊर्फ नलिनी मोहनीराज देवकर, रामभाऊ शंकरराव भुसाळ, मुरलीधर म्हाळू पुलाटे, झोनल मॅनेजर जी. प्रकाश, यूनियन बँक ऑफ इंडिया झोनल ऑफीस, रा. युनिव्हर्सिटी रोड, शिवाजीनगर, पुणे, झोनल मॅनेजर बँक ऑफ इंडिया, रा. युनिव्हर्सिटी रोड, शिवाजीनगर, पुणे, कार्यकारी संचालक विखे कारखाना, एस. एन. पाटील, व्ही. एस. गुंजाळ, साखर आयुक्त साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे अशा 54 आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 415, 420, 464, 465, 467 ,471, 34,120 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.