Friday, May 3, 2024
Homeनगरदुष्काळाच्या सावटाखाली दिवाळीचा गोडवा

दुष्काळाच्या सावटाखाली दिवाळीचा गोडवा

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दिवाळीचा दिपोत्सव, आनंदाचा सण. हिंदु संस्कृतित सर्वात मोठा सण, परंतु यंदाची दुष्काळी परिस्थितीत, खरीप हंगाम वाया गेला, सोयाबीनला म्हणावा असा भाव नाही. त्यामुळे एकूणच बाजारपेठेत शुकशुकाटच आहे.

- Advertisement -

थोडी फार गर्दी दिसते तीही फारशी दखल घेण्याजोगी नाही. दुष्काळाच्या सावटाखाली ही दिवाळी होत असल्याचे चित्र आहे. यंदा खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेल्याने त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. त्यामुळे या दिवाळीला फारसा उत्साह जाणवत नसल्याचे चित्र आहे. निव्वळ राहाता तालुक्याचेच हे चित्र नाही तर अवघ्या नगर जिल्ह्यात हे चित्र आहे. दिवाळीच्या कालच्या आदल्या दिवशी थोडी फार गर्दी बाजारपेठेत दिसून आली.

राहाता तालुक्यात पावसाचे सरासरी प्रमाण यंदा 50 टक्क्यांच्या आतच राहिले आहे. खरीप पेरणी ला पाऊस आला परंतू पुढे दिड महिना मारलेली दडी शेतकर्‍यांची चिंता वाढविणारी ठरली. त्यामुळे खरीप वाया गेला. थोडा फार हाती आला त्याला बाजारभाव नाही. काही शेतकर्‍यांना सोयाबीन पोतंभरही झाले नाही. सोयाबीन सारखे पिक शेतकर्‍यांच्या अर्थिक नाडी बनले आहे. परंतू यावर्षी सोयाबीनचे उत्पादन दहा टक्केच झाले. याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला. विहीरी तसेच इंधनविहीरी यांना पाणी न वाढल्याने रब्बी ची पिके उभी राहातात की नाही हा प्रश्न आहे. त्यातच समन्यायीचे भूत नाशिक, नगरच्या मानगुटीवर पक्के बसले आहे. त्यामुळे थोड्या फार उभ्या असलेल्या पिकांचे भवितव्य कसे असेल, याचीही शेतकर्‍यांना चिंता आहे.

बाजारपेठेतील व्यापारी, दुकानदार दुकानात माल भरुन बसले, परंतू त्याला ग्राहक नाही. मोठी गुंतवणूक केली. परंतू ग्राहक नाही. त्यामुळे दुकानदारही चिंतेत आहेत. दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टरचे वितरक हे ही फार खुश नाहीत. दसर्‍याला वाहने कमी विकले गेले. एक्सचेंज ऑफरचा पर्याय देवूनही ग्राहक शोरुम कडे फिरकायला तयार नाहीत. आता दिपावली पाडव्यावर या शोरुमची, दुकानदारांची भिस्त आहे. ग्राहक येतील आणि वाहने खरेदी करतील अशी त्यांना आशा आहे. सराफा बाजार, कापड बाजार, इलेक्ट्रॉनिक बाजारामध्ये गतवर्षीच्या तुलनेत अल्प ग्राहक दिसत आहे. महागाईने जनता त्रस्त आहे.

सोने विक्रेत्यांच्या दुकानात ग्राहकांची वर्दळ कमीच आहे. ग्राहकांनी आकर्षित करण्यासाठी दागिण्यावर आकर्षक भेट वस्तू जाहीर केली आहे. शहरातील बाजारपेठेत रेडीमेड कपडे, फटाके, इलेक्ट्रानिक्स वस्तू तसेच वाहन विक्रीची शोरुम सजून तयार आहेत. त्यासमोर डिस्कांउंट चे फलक दिसून येत आहेत. किरणा दुकानांत थोडी फार गर्दी दिसून येते. पुढील काही दिवसात सर्वच दुकानात गर्दी दिसून येईल, अशी दुकानदारांना अपेक्षा आहे.

दिवाळी म्हटले की गोडधोड करुन खाण्याची पध्दत असते. किराणा दुकानात, मॉल मध्ये यासाठी गर्दी थोडी फार दिसून येत असली तरी बनविलेले खाद्य पदार्थ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.

गणेश कारखाना तसेच विखे पाटील कारखान्याच्या वतीने कामगारांना बोनस देण्यात आला. पगारही करण्यात आला. गणेश ने कामगारांना 9 टक्के तर विखे पाटील कारखान्याने कामगारांना 20 टक्के बोनस दिला. गणेशने सभासदांना प्रत्येकी 10 किलो साखर मोफत दिली. तर विखे परिवाराने संपूर्ण मतदार संघात रेशनधारकांना 5 किलो साखर मोफत दिली. या राजकीय स्पर्धेत जनता सुखावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या