अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar
दुष्काळी परिस्थिती, शेतीतून अपेक्षित उत्पन्न नाही, डोक्यावर वाढत गेलेला कर्जाचा बोजा आणि त्यातच आजारपणाच्या उपचारांचा खर्च अशा आर्थिक विवंचनेतून खडकी (ता. अहिल्यानगर) येथील दीपाली प्रकाश रोकडे (वय 37) या शेतकरी महिलेने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून, गुरुवारी पहाटे हा प्रकार निदर्शनास आला.
दीपाली रोकडे यांच्या कुटुंबाकडे अवघी साडेतीन ते चार एकर शेती आहे. शेती आणि मोलमजुरीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, गेल्या काही काळात कुटुंबावरील आर्थिक संकट वाढत गेले. दोन वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी घेतलेले हात उसने स्वरूपातील सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे कर्ज, त्यानंतर अलाहाबाद बँकेचे सुमारे एक लाख रुपये, सेवा सोसायटीचे सुमारे 40 हजार रुपये तसेच खेळते भांडवल कर्जाचे 35 हजार रुपये, असा कर्जाचा मोठा बोजा कुटुंबावर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
त्यातच काही दिवसांपूर्वी दीपाली यांच्यावर आजारपणामुळे उपचार करण्यात आले होते. उपचारासाठी झालेल्या खर्चामुळे कुटुंबाच्या आर्थिक अडचणीत आणखी भर पडली. यंदाच्या खरीप हंगामात पेरणी करूनही पुरेसा पाऊस न झाल्याने शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. पुढील काळातही पावसाची परिस्थिती समाधानकारक नसल्याने शेतीतून उत्पन्नाची शक्यता कमी झाली होती. एकीकडे कर्जाची परतफेड कशी करायची, तर दुसरीकडे आजारपणाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला होता. शेतीचे उत्पन्न घटले असताना कर्जाचा वाढता बोजा आणि घरातील उपचारांचा खर्च यामुळे आर्थिक संकट अधिकच तीव्र झाले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
दीपाली यांचे पती प्रकाश रोकडे हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतीचे उत्पन्न कमी झाल्याने मोलमजुरीच्या उत्पन्नावर घरखर्च भागविणे, कर्जाची परतफेड करणे आणि उपचारांचा खर्च पेलणे कठीण झाले होते. याच पार्श्वभूमीवर दीपाली यांनी गुरुवारी रात्री घराजवळील विहिरीत उडी घेतल्याचे सांगण्यात आले. गुरूवारी पहाटे हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली. दीपाली रोकडे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी आणि सासू असा परिवार आहे. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे.




