श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपुरात गुंगीकारक नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका 30 वर्षीय तरुणाला शहर पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. काल्या उर्फ तस्लीम सलीम शेख (रा.नाहटा कॉलेजजवळ, इंदिरानगर, भुसावळ), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात नायट्राझेपम या गुंगीकारक गोळ्यांच्या 19 पाकिटांसह 23 हजार रुपये रोख रक्कम समाविष्ट आहे. ही कारवाई शुक्रवार दि.17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.50 वाजेच्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.
पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपास पथकाने शहरातील बसस्टँड परिसरात छापा टाकून तस्लीम सलीम शेख याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 19 पाकिटे नायट्राझेपम गोळ्या (प्रत्येकी 10 गोळ्या, किंमत 54 प्रति पाकीट) तसेच 23 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. गुंगीकारक औषधांच्या विक्रीचा कोणताही वैद्यकीय परवाना त्याच्याकडे नसल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123,125,278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तसेच उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, रोशन निकम, पोहेकॉ. प्रसाद साळवे, पोना. संदीप दरदंले, पोहेकॉ. अजित पटारे, मच्छिंद्र कातखडे, संभाजी खरात, सचिन दुकळे, आजिनाथ आंधळे, ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे करित आहे.




