Friday, May 3, 2024
Homeनगरआपण करोना विसरलो अन भोंगा, मंदीर, मस्जिद, धर्मावर भांडू लागलो

आपण करोना विसरलो अन भोंगा, मंदीर, मस्जिद, धर्मावर भांडू लागलो

बेलापूर |वार्ताहर| Belapur

करोनाचा कार्यकाळ आपण सर्वजण लवकरच विसरलो अन धर्म, भोंगा, मंदिर, मस्जिद या विषयावर भांडू लागलो आपला मनुष्य जातीचा मूळ गुणधर्म मानवता आहे हे आपण विसरत चाललो असल्याची खंत श्रीरामपूरचे पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

बेलापूर येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत श्री. मिटके पुढे म्हणाले, समाजात सोळा-सतरा धर्म आहेत. त्याद्वारे मानवतेचीच शिकवण मिळते. कुठलाही धर्म दुसर्‍या धर्मासाठी मारक नाही, हे सत्य असताना काही असामाजिक तत्व अफवा पसरवुन शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. त्याकरीता आपण जागृक राहीले पाहीजे, असे काही आढळल्यास आमच्या निदर्शनास आणून द्या, त्यांचा तात्काळ बंदोबस्त करु, बेलापूर गावाची लोकसंख्या मोठी असली तरी सर्व नागरीक जागृक असल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमीच आहे.

बेलापूर गावाचे नाव कुठेही संवेदनशील म्हणून नोंदले गेलेले नाही. काही स्वार्थी लोक आपली पोळी भाजून घेण्यासाठी एखादा विषय सतत पेटता ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा बंदोबस्त केला जाईल, सोशल मिडीयावर चुकीची पोस्ट टाकणारावर कठोर कारवाई केली जाईल. विना पोलीस बंदोबस्तात मिरवणूक काढण्याची परंपरा गावाने चालू ठेवुन एक नवा पायंडा सुरु करावा, असे अवाहनही मिटके यांनी केले .

पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी गावातील प्रमुखांची कमिटी स्थापन करण्याची सूचना केली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी गावाचा विषय गावपातळीवरच मिटविण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल मुथा यांनी केले. यावेळी जि. प. सदस्य शरद नवले, पंचायत समिती सदस्य अरुण पा. नाईक, पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, सचिव देविदास देसाई, उपसरपंच अभिषेक खंडागळे, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, भाजपाचे प्रफुल्ल डावरे, माजी सरपंच भरत साळुंके, अकबर टीन मेकरवाले, ईस्माईल शेख, मोहसीन सय्यद आदींनी मनोगत व्यक्त केले. पोलिस कान्स्टेबल रामेश्वर ढोकणे यांनी आभार मानले.

सदर प्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे, अशोक पवार, अशोक गवते, अजय डाकले, बाळासाहेब दाणी, आलम शेख, व्यापारी असोसिएशनचे प्रशांत लढ्ढा, पत्रकार दिलीप दायमा, किशोर कदम, शफीक आतार तसेच हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, कान्स्टेबल भिंगारदिवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या