अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण, खरीप हंगाम 2023 मधील पिकांच्या नुकसान भरपाईपोटीच्या अनुदानासाठी केवायसी करणे, मुख्यमंत्री-तीर्थदर्शन यात्रा आदी व्यक्तीगत लाभाच्या योजनांमुळे नागरिक आणि सेवा केंद्र चालकांनी ई-शिधा पत्रिका करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यात अवघ्या 11 लाख 13 हजार पैकी आतपर्यंत अवघ्या 8 हजार 546 कुटुंबांनीच ई-शिधा पत्रिका केल्या आहेत. समाजातील गरजूंना धान्य देण्यासाठी शासनाने शिधापत्रिका तयार केली होती. स्वस्त धान्य दुकानदारही बर्याचदा या कुटुंबासाठी आलेल्या धान्याची परस्पर काळ्या बाजारात विक्री करत. या गैरकृत्यांना प्रतिबंध करणे आणि गरीब कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर पॉश मशिनच्या सहाय्याने हाताचे ठसे घेऊन धान्य वितरणास प्रारंभ केला. पुरवठा विभागाच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पाडली जात होती. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत. त्यांना ई- शिधापत्रिका करून घ्यावी लागणार आहे. मोबाइलवर डाऊनलोड करून या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांना ई-शिधा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एक हजार 887 स्वस्त धान्य दुकानदार आहेत.
राज्य शासनाने नागरिकांच्या सोईसाठी सेतू केंद्र सुरू केले. केंद्र शासनाने काही योजनांसाठी स्थानिक पातळीवर आधार केंद्र सुरू केले. शासनाच्या इतर विभागांच्या सुविधांसाठी महा- ई सेवा केंद्र सुरू करण्यात आले. सेतू आणि महा-ईसेवा केंद्र राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली आहेत.
सेतू आणि महा-ई-सेवा केंद्रांचे एकत्रिकरण करून आपले सरकार सेवा केंद्र असे नामांतरण करण्यात आले. महसूल विभागाने मंजुरी दिलेले 649 तर जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या कर्मचार्यांसाठी दिलेले 1 हजार 320 केंद्र आहेत. जिल्ह्यात 1 हजार 969 सेवा केंद्र कार्यरत आहेत. हे केंद्र चालक मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, 2023 मधील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी अनुदानासाठी केवायसी करणे अशा व्यक्तीगत लाभाच्या योजना सुरू केल्या. सेवा केंद्र चालक या योजनांमध्ये व्यस्त असल्याने ई-शिधा पत्रिकांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी हे काम कासवगतीने सुरू आहे. नगर जिल्ह्यात 11 लाख 13 हजार ई-शिधापत्रिकाधारक असून यात 87 हजार अत्यांयोदय योजनेतील, 6 लाख 11 हजार 93 प्राधान्य योजनेतील, 3 लाख 54 हजार केशरी आणि 58 हजार 500 हे शुभ्र शिधापत्रिकाधारक आहेत. यातील 8 हजार 546 शिधापत्रिकाधारकांनी ई-शिधापित्रका काढलेल्या आहेत.