दिंडोरी | प्रतिनिधी Dindori
दिंडोरी परिसरात भूकंप सदृश्य धक्के (Earthquake-like tremors) बसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट बघावयास मिळत आहे. आज रात्री १० वा.६ मि. तसेच १० वा. १५ मिनिटांनी पुन्हा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असुन ही येणार्या काळात मोठ्या संकटाची चाहूल तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात असुन संबंधित विभागाने याबाबत खुलासा करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
दिंडोरी परीसरातील दिंडोरी शहर, मडकीजांब,हातनोरे, निळवंडी, जांबुटके, उमराळे (बु), तळेगाव दिंडोरी आदी गावांमध्ये १६ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आकाशात काहीतरी आवाज होऊन जमिनीला हादरे बसले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने नागरीकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले होते.
परंतु आज रविवार २१ ऑगस्ट रोजी रात्री १० वा ६मि. व १० वा. १५ मिनिटांनी पुन्हा जमिनीला हादरा बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही येणार्या काळातील मोठ्या संकटाची चाहूल तर नाही न ? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. संबंधित विभागाने याबाबत खुलासा करत नागरीकांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
येणार्या काळात जर खबरदारी घेण्याची आवश्यकता भासल्यास त्याबाबतही मार्गदर्शन संबंधित विभागाने करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. एकुणच दिंडोरी शहरासह परिसरातील गावातील नागरिक भूकंपाच्या धक्काच्या दहशतीखाली आले असून सोशल मीडियावर मोठ्या भूकंपाची भीती व काळजी व्यक्त करतांना नागरिक दिसत आहेत.तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेत परिस्थितीची चाहूल लक्षात घेऊन नागरीकांना सावध करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सदर जमिनीला बसलेले धक्के हे भुकंपाचेच आहेत की नाही या बाबत अद्याप पर्यंत नाशिक वेध शाळेकडून कुठलाही दुजोरा मिळालेला नाही.