Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या...तर अंजनेरीतील दुर्मिळ वनसंपत्ती नष्ट!

…तर अंजनेरीतील दुर्मिळ वनसंपत्ती नष्ट!

  • राखीव वनक्षेत्र : 569.360 हेक्टर

  • गिधाडांची 250 पेक्षा जास्त घरटी

    - Advertisement -
  • 105 प्रजातींचे पक्षी

  • लालमुखी माकड, वाघाटी, दुर्मिळ कंदीलपुष्प वनस्पती

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

त्र्यंबकेश्वरजवळ असलेल्या अंजनेरी गडावर जाण्यासाठी मुळेगावपासून थेट गडाच्या माथ्यापर्यंत सुमारे 14 किलोमीटरचा पक्का रस्ता करण्याचा प्रस्ताव पश्चिम वनविभागाकडे पाठवण्यात आला आहे.

हा रस्ता अंजनेरी संवर्धन राखीव वनक्षेत्रातून जात येथील 17 ते 20 हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामुळे गिधाडांचे 350हून अधिक घरटे आणि फक्त अंजनेरीवरच आढळणारे कंदीलपुष्प नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होण्याची भीती पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थांनी व्यक्त केली आहे.

अंजनेरी पर्वताला सन 2017 साली राखीव संवर्धन क्षेत्र असा दर्जा दिला गेला. या संवर्धन क्षेत्रातून आता जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग 14 किलोमीटर लांबीचा पक्का रस्ता करण्याचा घाट घालत आहे.

त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक पश्चिम वनविभागाकडे पाठवला आहे. वनविभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून सुमारे तीन हजार विविध प्रजातींची झाडे, लांब चोचीच्या गिधाडांची साडेतीनशेहून अधिक घरटी, विविध पक्ष्यांची घरटी, कंदीलपुष्पसारखी जगात केवळ अंजनेरीवर आढळून येणारी वनस्पती नामशेष होणार आहे.

एकूण निसर्गाची अपरिमित हानी हा रस्ता करणार असल्याची भीती सतावते आहे. रस्ता झाल्यानंतर थेट गडाच्या माथ्यावर वाहनांनी जाता येईल आणि राखीव वनक्षेत्रात प्रदूषणाचा भस्मासूर होईल.

येथील बिबटे, तरस, कोल्हे, खोकड, अंजनेरीचे प्रसिद्ध लालमुखाचे माकडे हे सगळे सैरभैर होतील, कारण त्यांचे संवर्धन संरक्षण करणारी वृक्षसंपदा नष्ट होईल, असे वन्यजीव, वनस्पती व वृक्षप्रेमींनी म्हटले आहे.

या रस्त्याला खुद्द अंजनेरी ग्रामस्थांचा विरोध असून माथ्यावर एकही झोपडी वा कुणा कुटुंबाचे वास्तव्य नाही. त्यामुळे वनसृष्टी धोक्यात घालून रस्त्याचा घाट कशाला? असा सवाल वन्यजीव, वृक्षप्रेमींनी केला आहे.

काही लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाला पर्यटनाचाच विचार करायचा आहे तर नाशिकमध्ये तपोवन व अन्य बरीच ठिकाणे आहेत, असे वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

अंजनेरीची वन व जीवसृष्टी वाचवण्यासाठी राज्यभरातून ऑनलाईन इ-स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली असून त्यात पाच हजार वन्यप्रेमींनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. हे पत्र आदित्य ठाकरे यांना दिले जाणार आहे.

छगन भुजबळ यांची भेट घेणार

रस्ता करू नये व मूळ मुद्याचे निवेदन शहर व जिल्ह्यातील वन्यजीव, वृक्षप्रेमी व वनस्पतीतज्ज्ञांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, वनसंरक्षकांना दिले आहे. यानंतर छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे यांची भेट घेऊन त्यांना याप्रश्नी वस्तुस्थिती सांगितली जाणार आहे.

तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, वनमंत्री संजय राठोड यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे, असे शेखर गायकवाड, अरुण अय्यर, अमित खरे, अनिल माळी व प्रतीक्षा कोठुळे यांनी सांगितले.

रस्ता होऊ नये यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क केला आहे. आरे जंगलाला जसा न्याय दिला तसाच न्याय अंजनेरीला हवा. अंजनेरीच्या रस्त्याला गावकर्‍यांचाही विरोध आहे. या रस्त्यामुळे 350 घरटी नष्ट होतील.

वैभव भोगले, वन्यजीवप्रेमी

- Advertisment -

ताज्या बातम्या