देशाच्या राजकारणात यंदा महाराष्ट्राने अभूतपूर्व चमत्कार घडवला. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांतून दत्तात्रय अवतारासारखी महाविकास आघाडी अवतरली. घाईघाईने शपथविधी उरकलेल्या मुख्यमंत्र्यांना औटघटकेत पायउतार व्हावे लागले. राज्याची सत्ता आघाडीने काबीज केली. भारतावर एकछत्री अंमल करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. ‘पुन्हा येणारच’ ही घोषणाही विरली. हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला गेला. त्याच्या परिणामी भाजप नेत्यांचे वैफल्य शब्दाशब्दांत सतत व्यक्त होत आहे. केंद्रीय नेतृत्वातील ‘चाणक्य’सुद्धा मराठी ‘चाणक्यां’च्या डावपेचाने चक्रावले आहेत. पूर्वाश्रमीचे मित्र दुरावले. कधीकाळी ‘मोठा भाऊ’ म्हणून दादागिरी करण्याची सवय सोडणे मात्र दुरापास्त! पूर्वाश्रमीच्या आपल्या निकटच्या मित्रपक्षाच्या नेतृत्वाला हरतर्हेने अपशकून करण्याचे वेडेवाकडे प्रयत्न अखंडित सुरू आहेत. अशावेळी मराठी अस्मितेला धक्का देणारी बातमी परवा येऊन थडकली. दिल्लीतील राजपथावर येत्या प्रजासत्ताकदिनी होणार्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ केंद्र सरकारने रोखला आहे. ‘मराठी रंगभूमीची पंचाहत्तर वर्षे’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाकडे राज्याने धाडला होता. या संकल्पनेवर आक्षेप घेण्यासारखे काय आहे? केंद्र सरकारनेच नेमलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात मराठी भाषेबाबत गौरवोद्गार काढले. मात्र केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या चित्ररथाचा प्रस्ताव धुडकावून मराठीद्वेषाची मळमळ उगाळली आहे. महाराष्ट्राची सत्ता हातातून निसटताच इतका आपपरभाव दाखवला जावा? भारत हे घटनात्मकरीत्या संघराज्य आहे. संघराज्यातील काही राज्ये विरोधी पक्षांकडे असतील तर ती संघराज्यातून बाहेर फेकली गेली का? महाराष्ट्राबद्दलचा दिल्लीश्वरांच्या मनातील द्वेष या निर्णयाने स्पष्टपणे जाहीर व्हावा का? पश्चिम बंगालच्या चित्ररथाबद्दलही अशीच सापत्न भूमिका केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. या राज्यांच्या चित्ररथांना राजकीय हेतूने परवानगी नाकारलेली नाही, सर्व राज्यांना संधी मिळण्यासाठी यंदापासून ‘आवर्तन पद्धत’ स्वीकारल्याची पोकळ सारवासारव करण्याची पाळी केंद्रावर का ओढवली? एकूणच अपेक्षाभंगाच्या दु:खाने विव्हळणार्या केंद्रीय नेतृत्वाचा हा निर्णय सर्वस्वी असमर्थनीय आहे. दर्जेदार चित्ररथ दिल्लीच्या राजपथावर सादर करून प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात महाराष्ट्राने सहा वेळा अव्वल स्थान पटकावले आहे. देशातील जनतेसाठी उदात्त विचारांचे प्रात्यक्षिक घडवणारा चित्ररथ महाराष्ट्र वर्षानुवर्षे प्रजासत्ताक दिनासाठी पाठवतो. अनेक मान्यवरांकडून ते चित्ररथ प्रशंसापात्र ठरले आहेत. यापुढे केंद्रात भाजपची सत्ता असेपर्यंत महाराष्ट्राची उपेक्षा करून मानहानी करण्याचा प्रयत्न सतत होत राहणार याचे संकेतच चित्ररथ नाकारून दिले गेले आहेत. ही तर सुरुवात आहे. केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद वा सहकार्याची अपेक्षा महाराष्ट्राने करू नये हेच बरे! कसोटीचे आणि कठोर परीक्षेचे अनेक प्रसंग राज्यापुढे आजच उभे आहेत. ‘दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही’ हे धोरण महाविकास आघाडीच्या नेत्यांना कृतीने सिद्ध करावे लागेल. केंद्र सरकारचा असहकार हीसुद्धा त्यादृष्टीने महाराष्ट्राला मजूबत करण्याची संधी देणारी पर्वणी ठरू शकते.