Wednesday, November 20, 2024
HomeUncategorizedसमस्या लग्न जमण्याची व टिकवण्याची

समस्या लग्न जमण्याची व टिकवण्याची

अर्जुन ताकाटे, 9423926047

समाजातील मुला-मुलींच्या संख्येतील असमतोलामुळे मुलांचे लग्न जमणे महाकठीण झाले आहे. काही पालक या समस्येवर मात करून मुलाचे लग्न जमवण्याचा प्रयत्न करतात. त्यात यशस्वी होतात. पण पुढे ते लग्न टिेकेल की नाही या विचाराने हैराण होतात.सजसा काळ बदलतो तसतशा समाजाच्या गरजा व समस्यादेखील बदलत जातात.

- Advertisement -

साधरणत: एक दशकापूर्वी, आपल्या मुलीचे लग्न जमवणे व ते सुखरूप करून देणे यासाठी मुलीचे वडील कर्जबाजारी होत असे. त्याचाच एक परिणाम म्हणून की काय, समाजातील काही दाम्पत्यांनी मुलगी नको असा सूर लावला व तो प्रत्यक्षात उतरवलादेखील. त्यामुळे समाजातील मुलींची संख्या कमी झाली.

अशा पालकांच्या मते कुटुंबाचा खर्च आणि मुलीचे लग्न जमवण्यासाठी होणारा त्रासही कमी झाला. पण ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. मुलगी नको म्हणणार्‍या दाम्पत्याचा मुलगा जेव्हा लग्नाचा झाला तेव्हा मात्र त्याला सून म्हणून मुलगी मिळेनाशी झाली. परिस्थितीशी तडजोड करून मार्ग काढून अनेक बापांनी मुलांचे लग्न लावून व संसार थाटून दिला.

तरीही प्रश्न इथेच संपला नाही.लग्न झाल्यानंतर चिंता अधिकच वाढली. ती म्हणजे झालेले लग्न टिकवण्याची. काही काळापूर्वी एका घरात कमीत कमी तीन ते चार मुली असायच्या. वंशाला दिवा पाहिजे या भ्रामक समजुतीतून अनेकांना सात ते आठ मुली झाल्याची उदाहरणे समाजात आहेत. इतक्या मुलींचे कौतुक करणे बापाला शक्य नव्हते. त्यामुळे दिल्या घरी सुखी राहण्याशिवाय मुलींकडे पर्याय नव्हता. मुलीच्या लग्नानंतर थोडी खदखद होत असे, मात्र नंतर संसार सुरळीत झाल्याचे हजारो दाम्पत्य आहेत.

पण आता काळ बदलला. एक तर मुलाचे लग्न लवकर जमत नाही म्हणून बाप मेटाकुटीला येतो, झालेच तर पुन्हा मुलगा व सून यांच्यात थोड्याच दिवसात खटके उडायला लागतात. सासू-सुनेचे टिपण बसने कठीण होते. अशा परिस्थितीत काय करावे, असा प्रश्न बापाला पडतो. अगदी साध्या साध्या गोष्टीवरून घरात भांडणे सुरू होतात.

मुलींचे काही हट्ट असतात. बरे काही मुलांना कामधंदा नसतो, असला तरी पगार कमी, त्यात काय करावे, हे त्याला समजत नाही. एवढ्यावर गोष्ट थांबत नाही तर घरातील सासू-सासरे यांचीही अडचण काही मुलींना वाटू लागते. याशिवाय घरातील आजारपण, मुलांचे शिक्षण, व्यावसायिक अडचणी, शेती असल्यास भांडवलाची अडचण, मजुरीचा प्रश्न या सार्‍याच बाबींमुळे नवरा मुलगा आणि कुटुंबातील सदस्य स्वास्थ्य गमावून बसतात.

याचा परिणाम असा होतो की, आलेली नवरी मुलगी सातत्याने माहेरी जाऊ लागते. सासरचे गार्‍हाणे सांगू लागते. त्यामुळे मुलीचे आई व बापाचा मुलीच्या संसारात हस्तक्षेप वाढतो. अर्थात, याला काही मुली अपवाददेखील असतात. भविष्यात सुखी संसार होईल या अपेक्षेने तडजोड करत राहतात. स्वत: कधीही दोन पैशांची कमाई न केलेले लोकदेखील त्या मुलाला कामधंदा करून पैसे मिळवण्याचा सल्ला देतात.

परिस्थितीच मोठी विचित्र तयार होते. आई, बाप, भाऊ, बहीण आणि पत्नी यामध्ये कसा समन्वय ठेवावा हे मुलाला समजत नाही. शांतपणे विचार करून मार्ग काढावा एवढी समजही या वयात सर्वांना आलेली नसते. वातावरण अधिक विकोपास जाऊन अखेर स्वतंत्र राहण्याचा मार्ग काढला जातो. स्वतंत्र घर सांभाळता सांभाळता तो अधिकच त्रस्त होतो. इथेच काही मुलांचा पाय घसरतो. व्यसनांशी मैत्री होते. या कालावधीत सावरणारा व्यक्ती लाभला तर ठीक अन्यथा पुढे वाताहत होते.

जेव्हा असल्या गोष्टी नवर्‍याकडून घडू लागतात तेव्हा मनात स्वप्न रचणारी नवरी मुलगी घाबरून जाते व कोणाचा तरी आधार शोधू लागते. निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू लागते पण सर्व काही व्यर्थ ठरते याची जाणीव तिला होते. स्वतंत्र राहत असल्याने नातेवाईकदेखील फारसे भानगडीत पडत नाहीत.

अशा वेळेस प्रसंगावधान सांभाळून वागणार्‍या मुली यशस्वी होतात पण स्वप्नात वावरणार्‍या अयशस्वी होतात, असा काहीसा अनुभव दिसतो. अशा वेळेस गावातील, परिसरातील, नात्यातील वयस्कर जाणकार व्यक्तींनी दोन गोष्टी हिताच्या सांगणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा कोर्ट प्रकरण, कोर्टाच्या तारखा, हेवेदावे यामध्ये सगळ्यांचेच सोन्यासारखे आयुष्य बरबाद होते.

ज्याप्रमाणे आजच्या जमान्यात मुलाचे प्रयत्नपूर्वक लग्न होते त्याप्रमाणेच झालेले लग्नदेखील प्रयत्नपूर्वक टिकवले पाहिजे. प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे संसारात गोष्टी घडतीलच असे नाही. याची सवय करणे गरजेचे आहे. आपला परिवार आनंदी, सुखी व समाधानी राहण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी काही बंधने पाळणे आवश्यक आहे. ज्यामुळे आयुष्याची सायंकाळ सुखद होईल.

उदाहरणार्थ घरात प्रत्येक गोष्ट बोलली गेली पाहिजे. त्यात लपवाछपवी नको. अपणाकडून चूक झाली असेल तर मान्य करावी. माफी मागितल्यास उत्तम. एका वेळेस एकानेच चिडावे. घरातील प्रत्येक व्यक्तीला आपले मत असते याची जाणीव कुटुंबप्रमुखाने ठेवावी. आपला मुलगा किंवा नवरा फक्त आपलाच आहे हे मनातून काढून टाकावे. कोणत्याही बाबीचा अतिरेक नको. घरातील सर्वांनी दुसर्‍याच्या गुणांचे कौतुक करण्यास शिकावे.

दुसर्‍याला मदत करा पण ती बोलून दाखवू नका. स्वभाव सर्वसमावेशक ठेवण्याचा प्रयत्न करावा. पती व पत्नी यांच्यातील अथवा कुटुंबातील गोष्टी बाहेर सांगू नयेत. यासाठी मनावर ताबा ठेवण्याचा सराव करावा. जिभेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. दुर्जनांची संगत कटाक्षाने टाळा. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

नवर्‍याने बायकोची आणि बायकोने नवर्‍याची अवहेलना टाळावी म्हणजे टोकाचा प्रसंग येणार नाही. शुल्लक कारणावरून वाद घालू नका. मोठ्यांना चरचर बोलू नका.  यासारख्या संसारोपयोगी बाबींचा अंगीकार केल्यास समाजातील तरुण- तरुणीचे संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. कौटुंबिक समस्यादेखील दूर होतील.

टिकेल नाते टिकेल संसार 

हेका मात्र धरू नका. 

आपणच आपले सुखदु:खाला 

हे मात्र विसरू नका. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या