नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शिक्षण प्रणालीमध्ये (Education System) धोरण ठरवताना त्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी चांगले कार्य करणाऱ्या शिक्षण संस्था, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या संस्थांची पाहणी करून, संवाद साधून, वास्तविकतेवर आधारित राज्यव्यापी धोरण ठरवण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले.
स्नेहनगरी (ऐना, ता. डहाणू, जि. पालघर) येथील ग्राममंगल संस्थेला पालकमंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन तेथील शिक्षण प्रणालीची माहिती घेतली. त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील हिवाळी या गावच्या शाळेला भेट दिली. ग्राममंगल येथे भेट दिली असताना त्यांच्यासमवेत शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, शिक्षण संस्थेचे रमेश पानसे, हेरंब कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिक्षणमंत्री (Education) भुसे म्हणाले की, शिक्षणकार्य सिद्धी नेणाऱ्या तज्ज्ञांची भेट घेताना पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहे. खासगी संस्थाचालकांशी संवाद साधणार आहोत. यासोबतच घरी बसलेल्या मुलांच्या कुटुंबांना त्यांच्या पाल्यांना आनंददायी शिक्षण कसे देता येईल यादृष्टीनेही विचारविनिमय केला जात आहे, अनेक लोकांनी अनेक वर्षे या क्षेत्रासाठी काम केले आहे. त्यांचे चांगले वाईट अनुभव समोर येतात. त्यातून नवीन मार्ग काढणे आपणास सोपे होणार आहे.
ऊसतोड कामगारांचे पाल्य, वीट बांधकाम कामगारांचे पाल्य हे सातत्याने होणाऱ्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य होत आहेत. त्यांच्यावर ठोस भूमिका घेऊन काही उपाययोजना सुचवणे आवश्यक आहे. त्यावरही मंथन केले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिव्हाळ्याचा विषय हा शालेय शिक्षण आहे. या विषयाची जबाबदारी घेताना अनेक अडचणी, आव्हाने समोर येणार असल्याचे सांगितले होते. शिक्षण विभागाच्यादेखील बऱ्याच त्रुटी आहेत. त्या दुरुस्त करणेही गरजेचे आहे. पालकांना, विद्याथ्यांना ग्रामशिक्षण समित्या, प्रयोगशील शाळा व उपक्रमांचा अभ्यास करून त्यांच्या माध्यमातून शिक्षणाच्या दिशा व धोरण ठरवणे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हिवाळीची शाळा ३६५ दिवस सुरू
त्र्यंबकची हिवाळी शाळा ३६५ दिवस सुरू असते. या ठिकाणच्या मुलांना राज्यघटना पूर्ण पाठ आहे. ही मुले दोन्ही हाताने लिहितात. आदिवासी भागातील ही मुले व त्यांना शिकवणारे शिक्षक हे जीवाचे रान करून शाळा सुरू ठेवत आहेत. त्यामुळे या शाळेला भेट देऊन त्यांची कार्यपद्धती जाणून घेत ती राज्यभर कशी उपयोगाला येऊ शकेल, यावर विचारविनिमय करणार आहोत.