Monday, July 15, 2024
Homeब्लॉगकर्तव्यभावनेचा प्रवास

कर्तव्यभावनेचा प्रवास

परवा सहजपणे वर्तमानपत्रातून आलेली एका शाळेची जाहिरात हाती पडली..शाळेचे मैदान,उंच इमारती,शाळा व वर्गात सी.सी.टी.व्हीची उपलब्धता, जी.पी.एस.ट्रॅकिंगसह बससेवा,संगणक प्रयोगशाळेची उपलब्धता असं काही जाहिरातीत लिहिलेले होते. यात शाळा म्हणून समाजाने निर्माण केलेल्या या संस्थेकडून जे काही अपेक्षित केले आहे त्या अपेक्षांबददल तर काहिही नोंदविलेले नव्हते.

- Advertisement -

शिक्षणातून माणूस घडवायचा असतो. उत्तम नागरिक निर्माण करायचे असतात. समाजासाठी उत्तम साहित्यिक, कलावंत, अधिकारी ,कामगार, गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ, क्रीडापटू , शिक्षक, डॉक्टर, व्यावसाय़िक हवे असतात त्याची निर्मिती हेही शिक्षणाचे उद्दीष्ट असते. त्यासाठी शिक्षणात काय असायला हवे.. त्या दृष्टीने शाळेने केलेले प्रयत्न महत्वपूर्ण असतात मात्र मुळ ध्येयालाच फाटा देत केवळ देखाव्याचा उल्लेख. विद्यार्थी घडविण्यासाठी होणारे प्रयत्न, त्यासाठीची प्रक्रिया नमूद नाही.

शाळांची उंची आता केवळ उंच उंच इमारती आणि भौतिक सुविधांनी मोजली जाणार असेल ,तर समाजाची उंची हरवत चालली आहे का ? असा प्रश्न पडतो. इमर्सन नावांचा विचारवंत लिहितो जेव्हा छोटया माणंसाच्या सावल्या मोठया पडू लागतात तेव्हा समाजाचा -हास जवळ आला आहे असे समजावे. त्या प्रमाणे जेव्हा मोठया व समाज घडविणा-या संस्थांना आपल्या ध्येय आणि उद्दीष्टाशिवाय प्रवाहपतित होऊन जाहिराती करू लागतात आणि दर्शनीय असलेल्या संस्था जेव्हा प्रदर्शिय ठरू लागतात तेव्हा समाजावे समाजाचा प्रवास उलटया दिशेने सुरू झाला आहे.

खरेतर उत्तमतेची कधीच जाहिरात करावी लागत नाही. अनुभव हीच सिध्दी असते. शिक्षण ही सामाजिक संस्था आहे. तीच्याव्दारे माणूस निर्माण होत असतो. प्रत्येक बालक हा भिन्न आहे. त्याचा आर्थिक , सामाजिक आणि सांस्कृतिक स्तर भिन्न आहे. त्यामुळे त्याच्या जडणघडणीकरीता पुन्हा वेगळे प्रयत्न असतात. बालकांला जाणून, समजून शिक्षण सुरू असते. त्यासाठी निश्चित अशी एकेरी आणि तीच तीच प्रकिया असत नाही. शिक्षणात गुणवत्तेचे मनुष्यबळ महत्वाचे असते. ते मनुष्यबळ किती परिणामकारक व प्रभावी काम करते त्यावर शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो. त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे मुलांवर प्रभाव पडत असतो.अशी अभ्यासू माणंस आणि मूळ ध्येयाने काम करणारी माणंस कधीच जाहिरातीवर भर देत नाही.

जाहिरात खर्‍या गुणवत्तेसाठी करावी लागतच नाही. गुणवत्ता ही दर्शनिय असते ती कधीच प्रदर्शनिय असत नाही. शिक्षण,शिक्षक आणि शाळा समाजासाठी नेहमीच दर्शनीय राहिल्या आहेत. शेकडो वर्षानंतर समाजाच्या मुखात नालंदा, तक्षशीला, जग्गादाला, सोमपूर, ओदान्तपूर ही विद्यापीठे येतात. कारण तेथील शिक्षण प्रक्रिया व तेथील गुणवत्तेची माणंस हिच तेथील ओळख बनली आहे.आज अशी माणस हरवत चालली आहे.

माणस हरवली की ध्येयाचा प्रवास थांबतो. मग गुणवत्तेची पाऊलवाट हरवली जाते आणि मग ध्येयहिन पाऊलवाटेचा प्रवास अधोरेखित करण्यासाठी यंत्राची मदत घ्यावी लागते. माणंसाची उंची गमावणे झाली , की इमारतीच्या उंची महत्वाची वाटू लागते. जेव्हा आपण ज्या मार्गाने जाण्यासाठीचा रस्ता निवडला आहे तो मनापासून निवडला असेल तर त्यावर अंतकरणापासून प्रेम असते.त्यामुळे तो मार्ग कठिण असला तरी आणि समाजामान्य नसला तरी चालणे घडते आणि समाधान व य़शाचे शिखर सहज पादाक्रांत करता येते. ते चालत राहाणे घडत राहाते.

आपण जेव्हा त्यावरती प्रेम करीत राहातो तेव्हा तो मार्ग प्रसिध्दीचा आहे की नाही ? यशाचा आहे की नाही ? याचा विचार केला जात नाही.आपणाला जेव्हा प्रसिध्दीस यावे असे वाटते, प्रसिध्दीसाठी काही करावे वाटते, यशासाठी काही पण करण्याची वृती निर्माण होते तेव्हा हिणपणाचे व मूर्खपणाचे आहे हे लक्षात घ्यायला हवे.कृष्णमूर्ती यांनी हे केलेले विधान माणंसाला आपली मूल्य दर्शविण्यासाठी मदत करणारे ठरते. काही करून आपण प्रसिध्दीच्या झोतात राहाण्याचा प्रयत्न म्हणजे मूर्खपणाच आहे.

आपण केलेले काम हे देखील प्रदर्शन करण्याची वृत्तीला काय म्हणावे.. ? अनेकदा झोतात राहाणे..आणि समाजात चमकत राहाण्यासाठी केले जाणारे प्रयत्न म्हणजे केवळ आणि केवळ मूर्खपणाचे लक्षण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आणि संस्था आपण जे काही काम करतो आहोत, ज्या दिशेने प्रवास सुरू ठेवण्याच्या प्रयत्न अपेक्षित असतो त्या दिशेने प्रवास करणे शक्य नाही किवा त्या कामाबददल तळमळ नसते. तेव्हा प्रसिध्दीच्या खोटया मार्गाने स्वतःचे नसलेले वैभव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असतो.

शिक्षणाने केवळ यशावर प्रेम करायला शिकवायचे नसते..पण सध्या तर आपण य़शाचा ध्यास घेऊन चालत आहोत.पण आपण जे काही करीत आहोत त्यावरती प्रेम करायला वर्तमानातील शिक्षण शिकवत नाही.आपण जे काही करतो त्यापेक्षा आपल्याला अंतिम प्रयत्नानंतर मिळणा-या य़शावरती अधिक प्रेम असते. त्यामुळे करावयाच्या कष्टावरती प्रेम करणे राहून जाते आणि मग तो मार्ग न चालताही खोटया प्रसिध्दीच्या दिशेने प्रवास करावा लागतो.जे माझे नाही ते हरवले की आपल्याला अशा खोटया प्रतिष्ठेसाठी लढावे लागते.आपल्याला आपल्या कर्तव्यापेक्षा त्या कर्तव्याच्या फळाचेच आकर्षण अधिक वाटू लागते.

शिक्षण म्हणजे कर्तव्यभावनेचा प्रवास आहे.राष्ट्र व समाज निर्मितीचे काम आहे.येथे झोकून काम अपेक्षित आहे.स्वतःला गाढून घेणे असते.येथे तर चांगल्या कामाची जाहिरात नसते , तर विद्यार्थ्यांच्या हदयावर कोरणे असते.उत्तम व अभ्यासपूर्ण अध्यापनाने शिक्षकाला वर्तमानातील देखाव्यात स्थान मिळणार नाही , पण ते शिक्षक विद्यार्थ्यांच्या हदयावरती जीवनभर कोरले गेलेले असतात. एक शिक्षक अंत्यत प्रभावी काम करीत होते.

शिक्षण हाच त्यांचा ध्यास होता.त्यांचा सारा प्रवास म्हणजे एका दिशेचा शोध होता..माणूस निर्मितीचा ध्यास होता..अंखड प्रवास संशोधन, उत्तम अभ्यासात त्यांनी गुंतून घेतले होते. पण त्यांना कधीच प्रसिध्दी मिळाली नाही.त्याची त्यांना खंतही नव्हती.ते कधी पुरस्काराच्या आणि प्रसारमाध्यमांच्या पानावर चमकले नाहीत. केवल कर्तव्याची भावना आणि जबाबदारीची जाणीव त्यांना होती. मात्र जेव्हा अंगी काही नसलेले आणि देखावे करणारी माणंस मात्र चमकत होती..त्यांची त्यांना अधूनमधून खंत वाटायची.

एक दिवस त्यांनी ठरविले चांगले काम करून आपल्याला समाजात स्थान नसेल तर वाईट काम करूया आणि माध्यमांच्या पानांवर स्थान मिळूया. ..म्हणून ते बायकोची अनुमती घेऊन घराच्या बाहेर पडले. जिल्हयाच्या ठिकाणी जातात . तेथे पोलिस स्टेशन गाठतात..कोणतीही भिडभाड न ठेवता सरळ स्थानकात गेले आणि समोर बसलेल्या साहेबांच्या श्रीमुखात भडकावली..साहेब तात्काळ उभे राहिले. गुरूजींना वाकून नमस्कार करीत त्यांनी शिपायला कॉपी आणण्यास सांगितले. तेव्हा साहेब म्हणाले “ गुरूजी तुम्ही पेरलेले संस्कार हा जीवनाचा ठेवा आहे.तुम्ही जे पेरले ते उगवले आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात. पण गुरूजी तुमचे संस्कार कधीच विसरणार नाहीत ”.

गुरूजीनी कॉपी घेतली आणि निराश मनाने बाहेर पडले. पुढे आता काय करायचे असा विचार सुरू होता…अखेर काही करून प्रसिध्दी हवी होती. त्यामुळे प्रसिध्दीसाठी त्यांनी रस्त्यांने जाणा-या एका मुलीचा हात पकडला…आणि त्या पुढे जाणा-या मुलीने मागे वळून पाहिले..तर आपले गुरूजी..भर रस्त्यात तीने वाकून नमस्कार केला..आणि ती म्हणाली “ गुरूजी आजच जिल्हयाची जिल्हाधिकारी म्हणून रूजू होण्यासाठी आले आहे. तत्पूर्वी शहर फिरून पाहावे म्हणून पायी फिरत होते..आले तेव्हाच तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. मी तुम्हाला भेटण्यासाठी गावी येणार होते. पण देवाने माझी विनंती ऐकली आणि तुम्हालाच माझे पर्यत पाठविले. आता माझ्या सोबत घरी चला..”

गुरूजी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानावरती आले..जिल्हाधिकारी बाईंनी गुरूजींना स्वतःच्या हातांने तयार केलेले जेवन जेऊ घातले आणि लाल दिव्याच्या गाडीत घरी पोहचविले.घरी आलेल्यानंतर बायकोने विचारले मग काय मिळाली का प्रसिध्दी.. ? तर गुरूजी निराश मनाने म्हणाले, “ नाही..मी वाईट करूनही त्यातून चांगलेच उगवले ” तेव्हा बायको म्हणाली “ चांगले गुरूजी हे प्रसिध्दीसाठी माध्यमांच्या पानापानावर नसतात , तर ते विद्यार्थ्यांच्या हदयावर असतात.चांगले शिक्षक जोवर विद्यार्थी जीवंत असतात तोवर ते जीवंत असतात ”.

चांगल्या शिक्षकांसाठी शाळा, महाविद्यालय ओळखली जात होती. चांगले शिक्षक हेच शिक्षण संस्थाचे भूषण असते. कारण ते जे काही पेरणार असतात आणि त्यातून समाजासाठी जे काही उगवणार असते त्यावर शिक्षण संस्थाचा ब्रॅंड ठरलेला असतो. मात्र दुर्दैवाने वर्तमानात शिक्षणांच्या होणा-या जाहिराती पाहिल्या, की शिक्षणातून काय हरवत चालले आहे हे सहजपण लक्षात येते.

शाळा,महाविद्यालयात चांगल्या शिक्षकांच्या जागा या भौतिक सुविधा कधीच घेऊ शकणार नाहीत..पण माणंस जेव्हा हददपार होत जातील तेव्हा आपण बरेच काही गमवलेले असेल..शाळा म्हणजे जीवंत माणंस आणि त्यांची नैतिकतेची पाऊलवाट चालणे असते.केवळ सिमेंटची जंगले आणि डांबरी रस्त्यांनी सजलेले आणि विचाराचा गंध नसलेली हिरवळ म्हणजे शिक्षण नाही हे लक्षात घ्यायला हवे.

प्रामाणिकपणे पेरणी करणारे शिक्षक..मूल्यांची धारणा जपणारी माणंस आणि समाज व राष्ट्रासाठी आपला प्रवास सुरू ठेवणारी माणंस..आत्मसन्मान जोपासणारी आणि ध्येयासाठी चालत राहाणारी माणंस म्हणजे शाळा असते..अन्यथा शाळेची “ शाळा ” करणारी माणंस वाढू लागली , की शाळांना जाहिरातीची गरज भासू लागते आणि तीही मुक्या भिंतीची आणि शिक्षणाशिवाय उरलेल्या सुविधांची…समाजाने ठरवायला हवे आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे..

-संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या