Friday, May 3, 2024
Homeब्लॉगवाचायचे तरी कशाला?

वाचायचे तरी कशाला?

कालच भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. एखाद्या राष्ट्रपतींच्या स्मरण करण्यासाठी वाचन प्रेरणेसारखा उपक्रम घेणे म्हणजे वाचनाचे मोल किती आहे जाणून घेणे आहे. पुस्तकं वाचनाने अनेकांचे आयुष्य बदलले आहे. अनेकांच्या आयुष्याला पुस्तकांनी मोल प्राप्त करून दिले आहे. अनेक तास समाजमाध्यमांवर खर्च करण्यात वेळ वाया घालवणारी आजची तरूणाई आपण पाहतो आहोतच. अशावेळी तो वेळ पुस्तक वाचनासाठी दिला तर राष्ट्राचे व समाजाचे चित्र बदलू शकते असा सांगणारा एक समूह आहे. खरंतर पुस्तक वाचनात मोठी शक्ती आहे.वाचनात व्यक्तीचे जीवन परीवर्तनाची प्रेरणा आहे. उत्थानाची शक्ती आहे…आणि महानतेच्या प्रवासाची प्रकाशवाट आहे.. एका पेपर विक्रेत्यापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत नैतिक प्रवास हा केवळ आणि केवळ पुस्तकांच्या सहवासाने आणि वाचनाच्या प्रेरणेने निर्माण झाला आहे हे त्यांच्या जीवन चरित्रावर नजर टाकली की सहजतेने जाणवत राहाते. त्यामुळेच या निमित्ताने होणारे कार्यक्रम वाचन प्रेरणा दिन येथील माणसांच्या मनात अंतरिक प्रेरणा निर्माण करेल का? आपली हरवलेली मूल्याधिष्ठीत समाज व्यवस्थेची पुनर्स्थापना करण्याबरोबर विज्ञानाच्या प्रगत वाटेचा प्रवास घडवून आणू शकेल का? जो समाज वाचता असतो तोच समाज भविष्यवेधी भरारी घेत असतो हे लक्षात घ्यायला हवे म्हणूनच वाचायला हवे.. पण आजच्या तरूणाईच्या मनात वाचायचे तरी कशाला याप्रश्नाचे उत्तर देणारी आणि वाचनारी माणसं आपल्या भोवतालमध्ये दिसायला हवी आहेत. तरूणाईचे प्रश्न मुळात चुकीचे नाहीत ,तर त्यांच्या भोवतालमध्ये त्या स्वरूपाचे प्रतिबिंब त्यांना दिसत नाही हे मुळात वास्तव लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे या वाटा पुन्हा नव्याने निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

समाजाचे उत्थान घडविण्यासाठी शिक्षण संस्थाची निर्मिती जाणीवपूर्वक करण्यात आली आहे. शिक्षण संस्थामध्ये शिक्षक जितके महत्वाचे असतात तितकेच महत्व ग्रंथालय आणि ग्रंथपालही असते. जगाच्या पाठीवर जो समाज वाचत जातो ते समाजच प्रगतीची भरारी घेत असतो.असा वाचता समाज घडविण्याचे काम शाळा करत असते. त्यासाठी शाळांनी समृध्द ग्रंथालयाची वाट चालण्याची गरज आहे. शाळांमध्ये होणारे वाचन संस्कार जीवनभर टिकतात.शैक्षणिक गुणवत्ता विकासात ग्रंथालयाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक समृध्दतेची वाट ग्रंथालयाच्या महाव्दारातून जाते. शिक्षक वाचते झाले तर विद्यार्थी आपोआप वाचते होतील. आपले शिक्षक वाचता आहेत म्हटल्यावर मुलांच्यामध्ये पुस्तक वाचनाचे आकर्षण निर्माण होईल. शालेय जीवनात पुस्तकांचा परीचय झाला तर भविष्यात उत्सुकतेपोटी उद्याचा समाज वाचता होण्यास मदत होईल. शिक्षक वाचते होतील तर परिवर्तन फारसे दूर नाही. जो समाज वाचतो तो समाज अधिक प्रगती साधत असतो. त्या समाजात शहाणपण, विवेक पेरण्याचे काम पुस्तके करत असतात. त्यामुळे जगाच्या पाठीवर अनेक प्रगत राष्ट्रांनी समाज समृध्दतेसाठी शाळा महाविद्यालयांच्या बरोबर गावागावांतही ग्रंथालय निर्मितीचा करण्यावर भर दिला आहे. फ्रान्स सारख्या देशात जगातील सर्वात मोठे ग्रंथालय निर्माण केले गेले होते. पुस्तके मस्तके घडवत असतात. त्यातून विचार करणारा समाज निर्माण होत असतो. समाज व्यवस्थेत अधिकाधिक ग्रंथालय असणे हे कोणाही विकृत आणि धर्ममार्तंडांच्या दृष्टीने व्यवस्थेसाठी धोक्याचेच असते. त्यामुळे विकृत लोकांनी ग्रंथालय जाळण्यावर भर दिला आहे. अनेकदा हा धोका लक्षात घेऊन पुस्तकांचा प्रसार होणार नाही याची काळजी घेणारी एक व्यवस्था कार्यरत असते. समाज शहाणा करण्यासाठी फारसे कोणी धजावत नाही. समाज शहाणा होणे हे धर्ममार्तंडासाठी आणि स्वार्थी राजकारण्यासाठी अडचणीचे असते. ज्या व्यवस्थेतील धुरिणांना समाज अधिकाधिक उत्तम आणि समृध्द व्हावा असे वाटते ते लोक आपला समाज वाचता होईल यासाठी सतत प्रयत्न करत असतात. आज शिक्षण होत असले तरी माणूस वाचनापासून दूर जातो आहे. वाचनामुळे विवेकाची वाट सापडत असते..पण आज शिक्षण तर मार्कांचीच वाट दाखवत आहे.त्यामुळे हाती पदवीचे प्रमाणपत्र घेऊनही विचार करणे घडत नाही.. काल परवा अहमदनगरमध्ये जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर खुनी हल्ला झाला. त्यांना जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. ती सुपारी ही अवघी 15 हजाराची होती. एखाद्या माणसाला मारण्यासाठी पाचजण पंधरा हजाराची सुपारी घेतात.. म्हणजे माणूस मारला तर प्रत्येकी तीन हजार मिळणार असतात.. त्या तीन हजारासाठी जीव घेणे घडते हे आपल्या शिक्षणाचा पराभव आहे. याचा अर्थ जीव मारण्यासाठी अधिक रक्कमेची सुपारी घ्यावी असे नाही, तर मुळात माणूस मारला जाणार नाही याचाच विचार रूजवला जाण्याची गरज आहे. कधीकाळी नारायण सुर्वे यांनी म्हटले होते, की माणूस सस्ता झाला बकरा महाग झाला.. हा विचार आज वास्तवात अनुभवास येत आहे. आपण वाचनापासून दूर गेल्याने भोवताल समजून घेण्यास कमी पडलो आहोत. त्यामुळे चिंतन, मनन घडणे घडत नाही.. माणसांच्या जीवाचे मोल जाणणे घडत नाही.. आपण शिक्षित होऊनही सुशिक्षित होण्याच्या प्रक्रियेपासून कित्येक मैल दूर आहोत. कृष्णकुमार म्हणाले होते की, वाचता येऊनही न वाचनारी माणसं ही अशिक्षित समजायला हवी. आज अशी अशिक्षित माणसांची संख्या वाढत असल्याने समाजात अंधकाराचे चित्र दिसते आहे. त्यामुळे नव्या शिक्षणाच्या प्रक्रियेला सामोरे जाताना वाचती पिढी घडविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

- Advertisement -

जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत, की प्रगतीची वाट चालण्यासाठीची ग्रंथालयाचे माध्यम निवडता आहेत. समाजाचा शहाणपणाचा मार्ग हा ग्रंथालयाच्याव्दारातून जातो हे लक्षात घ्यायला हवे. फ्रान्स सारख्या देशात ग्रंथालय आणि वाचन यांना अनन्य साधारण महत्व आहे. तेथील प्राथमिक स्तरावर शाळांमध्ये अगदी पहिली पासून 30 मिनिटाच्या चार तासिका अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या आहेत. जगातील अनेक प्रगत देशात वाचन हा शाळा महाविद्यालयाच्या स्तरावर स्वतंत्र विषय मानला जातो. प्राथमिक स्तरावर आपण वाचन संस्कार रूजू शकला नाही तर भविष्यात वाचन संस्कार रूजण्याची शक्यता कमी होते. समाजात सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाता आहेत. शाळा महाविद्यालयांच्या निर्मितीमागे देखील हिच भूमिका असली, तरी त्यापलिकडे शहाणपणासाठी ग्रंथालयांची निर्मिती आवश्यक ठरते. माणसाच्या आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा यांच्या इतकीच पुस्तकांची आणि वाचनांची गरज आहे. लियो टॉलस्टॉल यांनी म्हटले आहे की, “माझ्या जीवनात तीन गोष्टी महत्वाच्या आहेत ते म्हणजे पुस्तकं, पुस्तकं आणि केवळ पुस्तकं” महानतेची वाट चालणा-या माणसांच्या आय़ुष्यात पुस्तकांचे मोल किती महत्वाचे आहे हे या माणसांची चरित्र वाचले की पुस्तकांचे स्थान अधोरेखित होते. वाचन हा एक आनंददायी अनुभव आहे. त्यासाठीचे संस्कार करण्यासाठी शाळा महाविद्यालयांसारखे दुसरे स्थान नाही. असे असताना आपली शाळा महाविद्यालयांची ग्रंथालय आहेत, पण ते केवळ निकष पूर्ण करण्यापुरती आहेत. त्यापलिकडे समृध्द होण्याच्या दृष्टीने ग्रंथालयांचा विस्ताराचा विचार व्हायला हवा. शाळेत समृध्द ग्रंथालय निर्माण केले जाण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आज प्रति विद्यार्थी पाच पुस्तके असावीत असे म्हटले आहे. केवळ पुस्तके असूनही उपयोग नाही तर त्यांचा सातत्याने उपयोग व्हायला हवा.सार्वजनिक ग्रंथालयांची अवस्थाही तशी फारसी समाधानकारक नाही. उत्तम, शहाणपण, विवेक पेरणा-या पुस्तकांपेक्षा अधिक सवलत मिळणा-या पुस्तके चालकांना भावतात. शासकीय निवड समिती असली तरी त्यापेक्षा अधिक कमिशन मिळणा-या पुस्तकांना अधिक पसंती मिळते हे आणखी दुर्दैवी आहे.

समाजात जेव्हा वैचारिक द्रारिद्रय, निष्ठा, विवेक, शहाणपणाचा अभाव येतो तेव्हा समाज व राष्ट्राच्या-हासाला सुरूवात झाली आहे असे समजावे. समाजात छोटया माणसांच्या सावल्या उंच उंच पडू लागतात तेव्हा आपला -हासाचा आरंभ झाला आहे असे मानावे. आज आपल्या भोवतालचे सामाजिक चित्र अधिक चिंताजनक आहे. समाजात हिंसेचे टोक गाठले जात आहे. भ्रष्टाचाराचा आलेख उंचावतो आहे. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कायदे केले जाता आहेत. विविध विभाग निर्माण केले जाता आहेत. कायदे केले म्हणजे भ्रष्टाचार करणारा माणूस भ्रष्टाचार थांबवतो असे घडत नाही. भ्रष्टाचार मस्तकात असलेला माणूस त्यासाठी नव्या पळवाटा शोधत असतो. भ्रष्टाचार थांबत नाही याचे कारण तो माणसाच्या विचारात दडलेला आहे. मस्तकात असलेला भ्रष्टाचार हा कायद्याने दूर केला जाऊ शकत नाही. त्यासाठी मस्तके घडविण्याची गरज आहे. ती मस्तके केवळ ग्रंथालयाच्या माध्यमातूनच घडविली जाऊ शकतात. प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे म्हणाले होते की, “ज्यांची मस्तके पुस्तके घडवितात ती कोणाच्या चरणावर नतमस्तक होत नाही”. समाजात लाचारांच्या फौजा कमी करण्यासाठी देखील पुस्तके मदत करत असतात. आपल्याला उत्तम समाज निर्माण करायचा असेल तर ग्रंथालयांची गरज अधोरेखित होते आहे. आज ते ग्रंथालये निर्माण करण्यासाठी सरकारी पातळीवर विशेष मोहिम निर्माण करण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. त्याशिवाय समाजाचे उत्थान घडण्याची शक्यता नाही. समृध्द ग्रंथालये हिच उद्याचा उन्नत आणि प्रगत समाज व राष्ट्र निर्मितीचा एकमेव राजमार्ग आहे.. ती वाट आज अधिक अंधुक होत असल्यानेच समाजात अज्ञानाचा अंधकार दाटून आला आहे.

कलामांसारखा माणूस जीवनभर पुस्तकांच्या प्रेमात होता. पुस्तकांनी आपल्याला जीवनभर मूल्यांच्या आणि नैतिकतेच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी प्रेरणा दिली आहे. राष्ट्रपती भवन सोडताना त्यांनी सोबत केवळ आपली पुस्तके सोबत बाळगली होती. त्यांच्या आयुष्यात तीन पुस्तकांचा मोठा प्रभाव होता. त्यातील कुरल नावाचे एक पुस्तक होते. त्या पुस्तकाने त्यांना अधिक शक्ती देत मूल्याधिष्ठीत जगण्यासाठीचे बळ दिले आहे. आज आपला समाज पुस्तकांपासून दूरावतो आहे. एकीकडे शिक्षण संस्था वेगाने उभ्या राहाता आहेत. लोकांच्या साक्षरतेचा आलेख उंचावतो आहे. त्याचवेळी मात्र पुस्तके वाचकांची संख्या घडते आहे. राज्यात प्रकाशित होणा-या एका पुस्तकाच्या आवृत्तीला विक्रीसाठी पाच दहा वर्ष लागतात. तेरा चौदा कोटी लोकसंख्या असलेल्या राज्याची अवस्था विचार करायला भाग पाडणारी आहे. एकेकाळी ड़ॉ.बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाशिवाय आपल्याला दुसरे काही नको म्हणून सांगायचे.. आय़ुष्यातील सारे गेले तरी चालेल पण पुस्तके जाता कामा नये असे म्हणत होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आपल्या प्रवासात सतत पुस्तकांची सोबत करत होते. ज्यांच्या हाती पुस्तके होते त्यांनी जीवनभर समाजाच्या विकासाची आणि उन्नत व्यवस्थेचा विचार केला. आज हरवलेली व्यवस्था जर पुनर्स्थापित करायची असेल तर आपल्याला केवळ वाचन प्रेरणा दिनाचा इव्हेंट न करता वाचता समाज निर्मितीसाठीचे पावले उचलावी लागणार आहे. राज्यकर्ते साहित्याच्या सहवासात जगत होती म्हणून ती मूल्याधिष्ठीत आणि समाज हिताची वाट चालत होती. आज अशा वाटा दूर्मिळ होताना दिसत आहे.. म्हणूनच समाजात मोठी पोकळी निर्माण होते आहे.. न वाचना-या समाजाला तसे कोणतेही भवितव्य नसते.. वाचनारा समाज संघर्षाच्या पातळीवर लढत राहतो.. पण त्यात विवेकाची वाट असते.. आणि विचार व दृष्टी असते हे कसे नाकारणार.. असा समृध्द समाज आपल्याला उभा केल्याशिवाय लोकशाहीची फळेच चाखता येणार नाही. अन्य़था कालच्या सारखाच आजचा प्रवास आपल्याला अनुभवावा लागेल..

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या