टिळकनगर |वार्ताहर| Tilknagar
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे शिवारातील गुलाबाच्या बागेलगद अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी टाकलेल्या गुटख्या छाप्यातील आरोपींच्या घरांची काल पोलीस प्रशासनाकडून झाडाझडती घेण्यात आली. तसेच धागेदोरे तपासण्यात आले. मात्र गुटखा प्रकरणातील मास्टरमाइंड अद्यापही पसारच आहे तर प्रकरणात अटक असलेल्या चार आरोपींच्या पोलीस कोठडीत 12 ऑक्टोंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
परिसरातील गुलाबाच्या बागेलगद असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये चोरट्या मार्गाने गुटख्याची विक्री, साठा, वाहतूक, वितरण सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव मंगळवारी सकाळी एकलहरेतील आठवाडीत समोर आले. येथे अर्धा कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत बेलापूरचा सलमान तांबोळी, राहता तालुक्यातील निमगाव परिसरातील साहिल विजय चोपडा, वैभव शांतीलाल चोपडा या दोघा चुलत्या पुतण्यासह लोणीतून फिरोज पठाण अश्या चौघांना विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केले.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गुटख्याच्या फरार मास्टरमाइंड हा गुटखा आणणे आणि तो उत्तर नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पुरविण्याचे काम करीत असे, याशिवाय ज्या गाड्यांचा वापर करून हा गुटखा उत्तर नगर जिल्हाभर गुटखा व्यासायिकांना गुटखा पुरविला जात असे त्या गाड्यांची माहिती घेऊन त्याबाबत आर.टी.ओ. कडे पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले गेले आहे.
ज्या ठिकाणी अर्ध्या कोटींहून अधिक गुटखा जप्त झाला, त्या ठिकाणच्या मालक, चालकांपर्यंत पोलीस प्रशासन चार दिवसांनंतर पोहचले असून पुण्याला पसार झालेल्या करीम आजम शेख सह अन्य एकाला चौकशीसाठी काल रात्री उशिरा ताब्यात घेतले असून आता या प्रकरणात मोठमोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असून, लवकरच गुटखा प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाने शेती महामंडळाकडेही पत्रव्यवहार करून छाप्याच्या ठिकाणची जागे संदर्भात अधिक माहिती घेत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले गेले.




