मुंबई | Mumbai
शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला आहे. पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यासह जे.जे. मार्ग पोलीस ठाणे आणि मंत्रालयात धमकीचा ई-मेल आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मंत्रालयात धमकीचा ई-मेल आल्याने पोलिसांनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात आहे.
ईमेलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवू असे म्हटले आहे. हा गंभीर ईमेल असून पोलीस गांभीर्याने दखल घेत हा ईमेल कुणी पाठवला, त्याचा आयपी लोकेशन तपासले जात आहे. कुणीतरी जाणूनबुजून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतेय का हे तपासले जात आहे.
मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणी तपास सुरु झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून निनावी धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख का केला? हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागचा उद्देश याची चौकशी सुरु आहे. अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती. मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत.
या आधी ठाण्यातील एका तरूणाने व्हिडिओ पोस्ट करत एकनाथ शिंदेंविरोधात विधाने केली होती. त्या तरूणालाही नंतर अटक केले तेव्हा तो मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले. त्यामुळे आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आल्याने पोलीस याचा गांभीर्याने तपास करत आहे.