अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेतून नाव वगळलेल्या मतदारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा एक संधी दिली आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदणी अशा कारणांमुळे ज्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झाली नाहीत, त्यांना आता पुन्हा अर्ज करता येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात एसआयआर प्रक्रियेदरम्यान तब्बल 2 लाख 85 हजार 718 मतदारांची नावे वगळण्यात आली होती. यातील पात्र मतदारांना आवश्यक पुरावे सादर करून मतदार म्हणून पात्रता सिद्ध केल्यानंतर पुन्हा मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे.
दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रियेतून वगळलेल्या मतदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला.
महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, तेलंगणा आणि नागालँड या राज्यांतील प्रारूप मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना पुन्हा नोंदणीची संधी देण्यात येणार आहे. यापूर्वी मतदारांना गणना अर्ज वितरित करण्यात आले होते. मात्र, काही मतदारांकडून हे अर्ज परत प्राप्त न झाल्याने त्यांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट होऊ शकली नव्हती. आयोगाने अशा मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी पुन्हा प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. या याद्या पंचायत भवन, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, यादीतून नाव वगळण्यामागील संभाव्य कारणांचाही त्यात उल्लेख असेल.
संबंधित मतदारांना निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे अर्ज सादर करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जुन्या मतदार ओळखपत्र क्रमांकाचा वापर करून अर्ज डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. बीएलओंना संबंधित मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्याबरोबरच व्हॉट्सप, ई-मेल आणि एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुबार नोंदणी टाळतानाच एकही पात्र मतदार अंतिम यादीतून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यास आयोगाने सांगितले आहे. या प्रक्रियेत मतदारांच्या निवासस्थानानुसार अर्ज सादर करण्याची पद्धत वेगवेगळी ठेवण्यात आली आहे.
पूर्वीच्या पत्त्यावरच वास्तव्यास असलेल्या मतदारांना गणना अर्ज यापूर्वी का सादर करता आला नाही, याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. राज्यातच अन्य ठिकाणी स्थलांतरित झालेल्या मतदारांना नवीन पत्ता आणि विधानसभा मतदारसंघाची माहिती देऊन अर्ज करता येईल. त्यांच्यासाठी नमुना 8 भरण्याची आवश्यकता नसणार आहे. बेघर मतदारांकडे पत्त्याचा पुरावा नसल्यास बीएलओंचा प्रत्यक्ष पडताळणी अहवाल ग्राह्य धरला जाणार आहे. यापूर्वीच नव्या नोंदणीसाठी नमुना 6 भरलेल्या मतदारांना पुन्हा गणना अर्ज सादर करण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार 13 नोव्हेंबरपर्यंत मतदार यादीतून वगळलेल्या नावांबाबत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत होती. हे दावे आणि हरकती निकाली काढण्यासाठी 25 नोव्हेंबरपर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र, आता नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने या कार्यक्रमाला मुदतवाढ मिळणार का, की निर्धारित वेळापत्रकानुसारच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पुढील निर्देशांकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.
2 लाख 86 हजार मतदारांना संधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये एसआयआर प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये 1 लाख 41 हजार 212 मयत मतदार, 50 हजार 167 गैरहजर मतदार, 1 लाख 71 हजार 719 कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार आणि 1 हजार 125 अन्य कारणांमुळे नोंदणी न झालेल्या मतदारांचा समावेश आहे. या प्रक्रियेत मृत मतदारांची नावे वगळता उर्वरित पात्र ठरू शकणार्या मतदारांना आयोगाच्या नव्या निर्णयामुळे पुन्हा नोंदणीची संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 86 हजार मतदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.




