Friday, July 5, 2024
Homeदेश विदेशलोकसभेसाठी किती कोटी मतदारांनी केले मतदान? निवडणूक आयुक्तांनी थेट आकडाच सांगितला

लोकसभेसाठी किती कोटी मतदारांनी केले मतदान? निवडणूक आयुक्तांनी थेट आकडाच सांगितला

२०२९ च्या निवडणुकीबाबतही केली मोठी घोषणा

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मतदान झाल्यानंतर उद्या (दि.०४) रोजी या निवडणुकीचा निकाल (Result) जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह मतदारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मात्र, त्याआधी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पत्रकार परिषद घेत या निवडणुकीत किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला याची आकडेवारी सांगितली. तसेच भारतीय मतदारांचे आभार मानत निवडणुकीच्या मतदानात मतदारांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला, असे म्हणत निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी उभे राहून मतदारांचे कौतुक केले.

यावेळी बोलतांना राजीव कुमार म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत देशात ६४ कोटी २ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून हा विश्वविक्रम आहे. हे मतदान G7 मधील एकूण देशातील दीडपट अधिक तर, युरोपिअन युनिअनमधील २७ देशाच्या तुलनेत अडीचपट अधिक आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत ३१ कोटी १४ लाख महिलांनी मतदान केल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. याशिवाय पहिल्यांदाच ८५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील मतदारांसाठी घरी मतदान करण्याची सुविधा देण्यात आल्याचेही कुमार यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, देशात ९६.६ कोटी मतदार (Voter) आहेत. यामध्ये ४९.७ कोटी पुरुष मतदार आणि ४७.१ कोटी महिला मतदार आहेत. यापैकी एकूण ६४ कोटी २ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच, यंदा देशात ६२. ३६ टक्के मतदान झाले आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्येही यंदा मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. गेल्या चार दशकातील हे सर्वाधिक मतदान होते, असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. तर देशभरात १० लाखांहून अधिक मतदान केंद्र आणि दीड कोटीहून अधिक कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले होते, असेही राजीव कुमार यांनी म्हटले.

२०२९ मध्ये लोकसभेची निवडणुक एप्रिल अखेरपर्यंत संपणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर महिनाभराने म्हणजे १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील तर अडीच महिन्यांनी म्हणजे ०१ जूनला अखेरच्या टप्प्यातील मतदान झाले. या काळात निवडणूक कर्मचारी, अधिकाऱ्यांना उष्णतेचा त्रास सहन न झाल्याने काहींचा मृत्यू झाला. तर काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले. उन्हाच्या झळांनी मतदारांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही चांगलाच घाम गाळावा लागला. त्यामुळे यातून निवडणूक आयोगाने धडा घेत २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. यावेळी कुमार म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेमुळे मतदान कमी झाले. यामुळे २०२९ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक एप्रिलअखेरपर्यंत संपेल, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

मनी पॉवरला लगाम

यंदा निवडणुकीच्या काळात पैशांचा वापर कमी व्हावा, यासाठी आयोगाच्या यंत्रणेने देशभरात तब्बल १० हजार कोटींहून अधिक रोख रक्कम, मद्य, वस्तू, ड्रग्ज जप्त केले. मागील वर्षी हा आकडा केवळ ३ हजार ४७५ कोटी होता. यंदा १ हजार ५४ कोटी रुपयांची रोख रक्कम होती. तर २ हजार १९८ कोटी रुपयांच्या विविध वस्तू आहे. तसेच ८९८ कोटी किंमतीचे मद्यही जप्त करण्यात आले, अशी माहिती देखील कुमार यांनी दिली.

लापता जेंटलमनवरून प्रत्युत्तर

मतदानाच्या काळात निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लापता जेंटलमन म्हणत डिवचले गेले होते. या टीकेवरही राजीव कुमार यांनी आज प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आम्ही कधीच बाहेर गेलो नव्हतो. प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून आम्ही जनतेशी संवाद साधत होतो. मतदानाच्या काळात आम्ही जवळपास १०० प्रसिद्धी पत्रके काढली, असे त्यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या