अकोले |प्रतिनिधी| Akole
वीजेची तार अंगावर पडून एका शेतकर्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सुगाव खुर्द (ता.अकोले) गावच्या शिवारात बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या शेतकर्याच्या मृत्यूस महावितरण कंपनीचा गलथान कारभारच जबाबदार असल्याचा आरोप मृताचे कुटुंबीय व स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
बाबुराव नामदेव आहेर (वय 72) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्याचे नाव आहे. त्यांचे घर आणि शेती सुगाव खुर्द शिवारातील निळवंडे कालव्यालगत आहे. बुधवारी दुपारी चारा काढण्यासाठी ते शेतात गेले असताना अचानक शेतात विद्युत वाहिनीची तार त्यांच्या अंगावर पडली. या घटनेत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. विजेच्या तारांची क्षमता संपलेली आहे. यापूर्वीही अनेकवेळा तारा तुटून पडलेल्या् आहेत. ग्रामस्थांनी याबाबत महावितरण कंपनीकडे तक्रारी केल्या. मात्र त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली असा आरोप ग्रामस्थ व मृत कुटूंबियांच्या नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने महावितरण कंपनीने तातडीने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




