Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात कोट्यवधींची वीजबिल थकबाकी

जिल्ह्यात कोट्यवधींची वीजबिल थकबाकी

नाशिकरोड । दिगंबर शहाणे Nashik

गेल्या आठ महिन्यांपासून लॉकडाऊन काळात अनेक उद्योगधंदे बंद होते. तसेच अनेकांचे रोजगार बंद झाले होते. काहींना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. परिणामी उत्पन्न बंद झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली.

- Advertisement -

ग्राहकांना महावितरण कंपनीने वाढीव वीज बिले दिल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांंनी केला होता. परिणामी अनेक ग्राहकांनी अद्यापही वीज बिले भरलेली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून 3,343 कोटी रुपये थकबाकी येणे आहे.

‘करोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकंडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झाल्याने अनेकांचे रोजगार बुडाले होते. बहुतेक जण घरीच असल्याने मोठ्या प्रमाणात वीज वापर सुरू होता. त्यानंतर महावितरण कंपनीने काळातील थकित वीज बिले ग्राहकांना पाठवली. ही बिले भरण्यास अनेक ग्राहकांनी नकारही दिला.

तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांची वीजबिले माफ करावीत, अशी मागणी भाजप, मनसेना, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आदी राजकीय पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी लावून धरली होती. मात्र चार दिवसांपूर्वीच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिले माफ होणार नाहीत, ग्राहकांना वीज बिले भरावीच लागतील, असे सांगितले. परिणामी विविध राजकीय पक्षांनी आंदोलनाची हाक दिली.

ग्राहकांनी वीज बिल भरू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले तर मनसेनेने वीज बिलमाफी करण्याबाबत सोमवारपर्यंत मुदत दिली आहे. मात्र या इशार्‍यानंतरसुद्धा राज्य शासनाने वीजबिल माफीची घोषणा केलेली नाही. राज्यात सर्वच ठिकाणी अनेक ग्राहकांनी वीजबिल माफ होईल या आशेने वीज बिले भरलेली नाहीत. त्यामुळे महावितरण कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे.

कृषीपंपांचे थकित बील सर्वाधिक

नाशिक जिल्ह्यातसुद्धा सुमारे 22 टक्के ग्राहकांनी अद्याप वीजबिल भरलेले नाही. या ग्राहकांकडे 3,343 कोटी रुपये थकबाकी असल्याचे महावितरणचे म्हटले आहे. त्यात लघुदाबाच्या घरगुती, औद्योगिक, वाणिज्य क वर्गवारीतील ग्राहकांकडे 225 कोटी रुपये, उच्चदाब ग्राहकांकडे 53 कोटी तर कृषीपंप ग्राहकांकडे 2,846 रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी वसुली डिसेंबरपर्यंत करण्याचे आदेश देण्यात असले आहेत. मात्र ग्राहक थकबाकी भरण्यास किती प्रतिसाद देतात, याकडे महावितरणचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या