अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आनंदनगर येथे राहणार्या प्रीती गांगर्डे या चिमुरडीचा महावितरणच्या खांबातील विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने महावितरण कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी तब्बल पाच तास ठिय्या दिला.
आंदोलनात आ. संग्राम जगताप स्वतः सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीत महावितरण प्रशासनाशी चर्चा झाली. अखेर महावितरणकडून संबंधित अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत लेखी स्वरूपाचे पत्र देण्यात आले. तसेच काही अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात रवाना झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी आ. जगताप म्हणाले की, आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आलो आहोत आणि पुढेही करत राहणार आहोत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरणने शहरातील धोकादायक विद्युत यंत्रणेची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असते. मात्र, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. झाडांच्या फांद्या तोडून त्या रस्त्यावरच टाकल्या जातात, त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याबाबत आ. जगताप यांनी संताप व्यक्त केला. यावेळी संपत बारस्कर, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, मनोज कोतकर, संभाजी पवार आदी उपस्थित होते. आंदोलनानंतर महावितरण प्रशासनाच्या वतीने बालिकेच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत म्हणून 20 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
घटनेपूर्वीच दिली होती धोक्याची सूचना
आनंदनगर परिसरातील नागरिकांनी 21 ऑगस्ट 2025 रोजी महावितरण कार्यालयाकडे संबंधित विजेच्या खांबाबाबत लेखी तक्रार केली होती. या निवेदनामध्ये संबंधित इलेक्ट्रिक पोल अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तातडीने नवीन पोल बसविण्यात यावा, अन्यथा कधीही दुर्दैवी घटना घडू शकते, अशी स्पष्ट पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, या निवेदनाची दखल न घेतल्यामुळेच एका निष्पाप बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शहरातील धोकादायक विद्युत यंत्रणेची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.




