अहिल्यानगर |सचिन दसपुते | Ahilyanagar
येथील अन्न व औषध प्रशासनाने एप्रिल महिन्यात जप्त केलेल्या अमुल ब्रँडच्या कुल्फीबाबत मुंबई येथील राज्य प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये कुल्फीत वनस्पती तेल व फॅटचा वापर झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. अन्नसुरक्षा व मानदे कायद्यानुसार कुल्फी व आईस्क्रीमसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये अशा प्रकारच्या वनस्पती तेल अथवा फॅटचा वापर करण्यास मनाई असल्याने या अहवालाने एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे कोणती कठोर भूमिका घेतात, तसेच केवळ अहिल्यानगरच नव्हे तर संपूर्ण राज्यातील अमुल ब्रँडच्या कुल्फी व अन्य दुग्धजन्य उत्पादनांची विशेष तपासणी मोहीम राबविली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने 13 एप्रिल 2026 रोजी अहिल्यानगर शहरात कारवाई करत अमुल ब्रँडच्या 55 हजार 680 रूपयांचे एक हजार 856 कुल्फी पॅकेट्स जप्त केले होते. तपासणीदरम्यान या कुल्फीमध्ये वनस्पती तेल व फॅटचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर अधिकार्यांनी नमुने मुंबई येथील राज्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. नुकताच प्राप्त झालेल्या प्रयोगशाळेच्या अहवालात कुल्फीमध्ये वनस्पती तेल व फॅटची भेसळ झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांनी दिली. या निष्कर्षामुळे ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, देशातील सर्वात मोठ्या दुग्ध ब्रँडपैकी एक असलेल्या अमुलच्या उत्पादनांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विशेष म्हणजे, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (अमुल) मार्फत उत्पादित व पुरवठा करण्यात आलेल्या कुल्फीमध्येच हा प्रकार आढळल्याने प्रशासनासह ग्राहकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. त्यावेळी शहरातील तीन प्रमुख वितरकांकडे माल पोहोचविणार्या वाहनाची तपासणी करण्यात आली होती. याच वाहनातून पुरवठा होणार्या कुल्फीच्या नमुन्यांमध्ये ही कथित भेसळ आढळून आली. अन्नसुरक्षा व मानदे कायद्यानुसार आईस्क्रीम आणि कुल्फी हे पूर्णपणे दुग्धजन्य पदार्थ असून, त्यामध्ये वनस्पती तेल किंवा फॅटचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. अशा प्रकारची भेसळ सिध्द झाल्यास संबंधित उत्पादक, वितरक आणि जबाबदार घटकांविरूध्द कठोर कारवाईची तरतूद आहे.
आयुक्त मुंढे कारवाईचा बडगा उगारणार का ?
दरम्यान, अहिल्यानगर शहरात अमुलचे तीन अधिकृत वितरक असून संपूर्ण जिल्ह्यात सुमारे 50 वितरक कार्यरत आहेत. राज्यभरात अशा हजारो वितरकांमार्फत अमुलची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे या अहवालानंतर केवळ एका जिल्ह्यापुरती कारवाई मर्यादित राहणार की राज्यव्यापी तपासणी मोहीम राबविली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. अहिल्यानगर कार्यालयाकडून हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्तरावर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता राज्यभरातील अमुलच्या कुल्फी आणि तत्सम उत्पादनांवर विशेष मोहीम राबविली जाणार का, याकडे ग्राहक, व्यापारी आणि अन्न सुरक्षा विभागाचे लक्ष लागले आहे.




