Sunday, May 5, 2024
Homeनाशिकरोजगाराच्या संधी धूसर

रोजगाराच्या संधी धूसर

नाशिक | रवींद्र केडिया | Nashik

करोना (Corona) आला आणि व्यापार-उद्योग सर्व काही एकदम ठप्प झाले. उद्योगांची (Industry) चाके थंडावली. रोजगाराच्या (Employment) संधी धूसर होऊ लागल्या. उद्योजकांनी सर्वांना सावरून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर स्वतःच धोक्यात आल्याने इतरांचे विचार बाजूला ठेवून जगण्याची धडपड करताना दिसून आले…

- Advertisement -

सुरुवातीच्या टप्प्यात शासनाने (Government) कारखाने बंद असले तरी कामगारांना (Workers) पगार देण्याचे बंधन ठेवले होते. नंतर उद्योजकांनी उत्पादन प्रक्रिया बंद असल्याने कामगार कपातीचे धोरण सुरू केले. अनेक कामगारांचे रोजगार धोक्यात आले. बॉशसारख्या मल्टिनॅशनल कंपनीने साडेसातशे हंगामी कामगारांना थेट कमी केले. थोड्या अधिक फरकाने बहुतांशी कारखान्यांमधून कामगारांची कपात करण्यात आली.

करोनाचा लॉकडाऊन (Lockdown) ओसरताना उद्योग आणि व्यापार वेगाने स्थिरस्थावर होत होते. मात्र कामगारांचे रोजगाराचे प्रश्न गंभीर रूप धारण करून आहेत. कामगारांना पुनश्च रोजगार मिळणे कठीण झाले आहे.

कमी लोकांमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवावी. उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून आपले उत्पादन पूर्ण क्षमतेने काढून झालेल्या तोट्याची तोंडमिळवणी करण्याच्या उद्देशाने उद्योजकांनी असलेल्या कामगारांवर अतिरिक्त भार टाकण्यास सुरुवात केली आहे.

एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या कामांचा अनुभव देऊन त्याच्याकडून वेगवेगळ्या कामांची पूर्तता करून घेणे याला ‘मल्टी टॅलेंट’ असे गोंडस नाव दिले आहे . मल्टी टॅलेंट, मल्टी स्किल ही गुणवत्ता आज कामगारांसाठी आवश्यक गुणवत्ता बनली आहे. पूर्वी कामगारांच्या गुणवत्तेला ‘जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन’ असे म्हटले जाये.

ही कल्पना पूर्वी चालत होती. मात्र गेल्या काही वर्षांत बदलून ‘मास्टर ऑफ ऑल’ संकल्पना आवश्यक बनले आहे. कोणत्याही कामाचे जुजबी ज्ञान नको. तर कुशल व सर्वगुणसंपन्न कामगारांना विशेष मागणी होऊ लागली.

कारखान्यातील सर्वच विभागांचे काम त्याला अवगत असेल असा कामगार हल्ली विशेष पसंत केला जातो. गेल्या दोन वर्षांत उद्योगांची झालेली घसरण, पुन्हा स्थिरस्थावर होईपर्यंत अथवा पूर्वीच्या गतीपेक्षा जास्त गतीने धाव घेणे शक्य होईपर्यंत कामगार वर्गाची परवड तशीच राहणार असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील अनेक उद्योगांमध्ये पूर्वी कामाला लागलेले जुने कामगार निवृत्तीच्या उंबरठ्यावर आले आहेत. उतारवयाच्या काठावर मल्टी टॅलेंट नव्याने अनुकरण करणे त्यांच्यासाठी कठीण आहे. त्यामुळे मोठ्या पगारावर असलेल्या जुन्या कामगारांना ‘व्हीआरएस’ योजना लावण्यात येत आहे.

प्रत्यक्षात ती सीएसआर (कम्पल्सरी रिटायरमेंट स्किम) लावल्या जात आहेत. जुन्या लोकांना प्रत्येक कामाचा चांगला अनुभव असला तरी सर्वच काम ते करू शकत नसल्याने त्यांनाही बदलण्याची धडपड उद्योग क्षेत्रात सुरू आहे. प्रत्यक्ष परिस्थितीत मात्र नोकरीच्या संधी गमावलेल्या युवकांची व बेरोजगारांची संख्या मोठी असल्याने अल्प पगारात कामगार उपलब्ध होत असल्याने उद्योजक जुन्यांच्या जागी ‘कॉन्ट्रक्ट’वर कामगार भरती करू लागलेले आहेत.

अशा परिस्थितीत आपला रोजगार अथवा नोकरी टिकवण्यासाठी शारीरिक क्षमता नसतानाही विविधांगाची गुणवत्ता मिळवण्यासाठी कामगार धडपडताना दिसून येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या