मुंबई | Mumbai
महाभारतातील कुंतीपुत्र कर्णाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते पंकज धीर (Pankaj Dheer) यांचं निधन झालं आहे. (Mahabharat) ते कॅन्सरशी झुंज देत होते. अखेर आज बुधवार (दि.१५) रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६८ वर्षांचे होते. याआधी पंकज यांनी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली होती. परंतु, काही महिन्यांपूर्वी पुन्हा त्यांना कॅन्सरचे निदान झाले. त्यासाठी त्यांच्यावर सर्जरी देखील करण्यात आली होती. मात्र अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंकज धीर यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. मात्र बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेतील कर्णाच्या भूमिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. शिवाय ‘चंद्रकांता’मधील त्यांच्या शिवदत्तच्या भूमिकेवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. ‘बढो बहू’, ‘युग’, ‘द ग्रेट मराठा’, ‘अजूनी’ यांसारख्या मालिकांमध्ये ते झळकले होते. तर टारझन, ‘सोल्जर’, ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘रिश्ते’, ‘अंदाज’, ‘सडक’ आणि ‘बादशाह’सारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते.
दरम्यान, पंकज यांच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि सून असा परिवार आहे. पंकज यांचा मुलगा निकितनसुद्धा कलाविश्वात कार्यरत असून, त्याने ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये थंगबलीची भूमिका साकारली होती. याशिवाय निकितनेही वडिलांप्रमाणेच पौराणिक मालिकांमध्ये काम केले आहे. तर पंकज धीर यांची सून कृतिका सेंगरसुद्धा अभिनेत्री आहे.




