Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखवडीलधार्‍यांचा उत्साहाला साद घालणारी स्वागतार्ह सुूचना!

वडीलधार्‍यांचा उत्साहाला साद घालणारी स्वागतार्ह सुूचना!

सध्या भारत तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. तथापि सध्याच्या तरुण पिढीचे वय देखील वाढत जाणारच आहे. 2050 पर्यंत भारतातील ज्येष्ठांची संख्याही त्याप्रमाणात वाढतच जाणार! आयुष्याची काही वर्षे नोकरी करुन माणसे सेवानिवृत्त होतात. तोपर्यंत त्यातील बहुतेकांचे स्वत:चे घरदार झालेले असते आणि मुलेही स्थिरस्थावर झालेली असतात असे मानले जाते. साधारणपणे ते अयोग्य नाही. तथापि वाढते वयोमान हे देखील ज्येष्ठतेबद्दलच्या कल्पना बदलवू शकेल. ज्येष्ठांनी त्यांचे उर्वरित आयुष्य मजेत घालवावे अशीच समाजाची अपेक्षा असते. तथापि वाढत्या वयासोबत शारिरीक आरोग्यही सुधारत आहे. पूर्वी गृहित धरलेल्या कल्पनेप्रमाणे वयोवृद्ध म्हणजे अशक्त, दुर्बल, अधुनमधून आजारी पडणारे या कल्पना देखील आता बदलाव्या लागतील. त्यामुळे सध्याच्या नियमाप्रमाणे निवृत्त झालेले वयोवृद्ध पुढील किमान 10-15 वर्षे तरी शारिरीकदृष्ट्या सुदृढ असतील, असेही मानावे लागेल. त्याचेच प्रत्यंतर काही ज्येष्ठ नागरिक मंडळांनी मनपाकडे केलेल्या सुचनेतून मिळते. शहरात बांधलेली समाजमंदीरे पुरेशा व्यवस्थेअभावी योग्य रीतीने सांभाळली जात नाहीत. अशी समाजमंदीरे ज्येष्ठ नागरिक संघांकडे सोपवल्यास त्यांची उत्तम व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी स्वीकारण्यास ज्येष्ठ मंडळी तयार आहेत. वरील सर्व मुद्दे विचारात घेता ही अत्यंत विधायक आणि समाजाला उपकारक मागणी वा सूचना आहे. महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे समाजगृहे बांधली जातात. उद्याने उभारली जातात. पाणपोया बांधल्या जातात. त्यांची पुरेशी निगा मात्र ठेवणे शक्य होत नाही. ही कामे सोपवण्यात आलेली ठेकेदार मंडळी पुरेसे लक्ष देत नाहीत. देखभालीअभावी समाजमंदीरांची दूरवस्था झाल्याचे पदोपदी आढळते. पाणपोया तर बंदच आढळतात. अशा बंद खोल्यांच्या आड समाजकंटकांचे काय उद्योग चालतात हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. देखभालीअभावी उद्यानेही उद्वस्त होतात. तेथील झाडे आणि रोपे वाळून जातात. खेळण्यांची मोडतोड होते. त्यावरचा हा उपाय काही ज्येष्ठ नागरिक संघांनी सूचवला आहे. निवृत्तीवेतन, महागाई भत्ता, त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला अशा ज्येष्ठांच्या त्यांच्या सेवाकाळाशी संबंधित अनेक समस्या असतात. त्या सोडवण्याचे काम ज्येष्ठ नागरिक संघ इमानेइतबारे करतच असतात. पण ज्येष्ठांच्या मानसिक व शारिरीक स्वास्थ्याच्या दृष्टीने अशा सार्वजनिक जागांची देखभाल करण्याचे काम त्यांना नवी उभारी देणारे ठरेल. ज्येष्ठ मंडळी अनुभवांची खाण असतात. ‘संस्कारांची शाळा’ असतात. पण वाढत्या वयामुळे त्यांच्याकडे कौटुुंबिक जबाबदार्‍याही फारशा नसतात. त्यामुळे आपण निरुपयोगी ठरत आहोत अशी भावना कदाचित ज्येष्ठांना अस्वस्थ करत असेल. आपली कोणाला गरज राहिलेली नाही ही भावना देखील काहींना त्रासदायक वाटत असेल. मुलांच्याही दिनचर्येत काळानुरुप बदल झाले आहेत. तेही शाळा, शिकवणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे छंदवर्ग यात व्यस्त होतात. त्यातून त्यांचा उरलेला वेळ चलबोल (स्मार्ट फोन) खाऊन टाकतो. त्यामुळे घरातही आपण नकोसे होत आहोत का या शंकेने ज्येष्ठ अस्वस्थ होत असल्यास नवल नाही. अशा स्थितीत काहींची मानसिकता नैराश्याकडेही झुकत असेल. ज्येष्ठ नागरिक संघांनी केलेली सूचना अंमलात आणली गेली तर ज्येष्ठांचा वेळ आणि वाढत्या वयातही टिकलेला उत्साह सत्कारणी लागेल. समाजमंदीरे आणि उद्यानांची अवस्थाही सुधारेल. त्याअर्थाने ज्येष्ठांना काहीसे वय विसरायला लावणारी ही सूचना आहे. म्हणून स्वागतार्ह आहे. म्हणून संबंधितांनी या मागणीचा गांभिर्याने विचार करावा. प्रायोगिक स्तरावर काही संस्था देखभालीसाठी ज्येष्ठ नागरिक संघांकडे सोपवून पाहायला काय हरकत आहे?

- Advertisment -

ताज्या बातम्या