Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखपाणवठेही सुकले सगळे, अशी धरेची दैना झाली!

पाणवठेही सुकले सगळे, अशी धरेची दैना झाली!

ग्रीष्माची ती उष्ण काहिली,
रान सारे सुकून गेले
कोठेही ना वाहे वारा,
घालमेल ती अवघी झाली
पाणवठेही सुकले सगळे,
अशी धरेची दैना झाली

ही एका अज्ञात कवीने कधीकाळी व्यक्त केलेली भावना प्रत्यक्षात उतरण्याची भीती जलतज्ञ व्यक्त करत आहेत. मार्च आणि एप्रिलमधील चाळीशी ओलांडलेल्या पार्‍याने राज्यातील धरणांमधील एकूण जलसाठा 25 टक्क्यांनी कमी झाल्याचे वृत्त माध्यमात झळकले आहे. मे महिन्यातही तापमान असेच चढते राहाणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. पाण्याचे बाष्पीभवनही त्याच वेगाने होणार यातही शंका नाही. परिणामी आगामी काही दिवसात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या 44 टक्के साठा शिल्लक आहे. गेले दोन महिने तळपते ऊन माणसांना भाजून काढत आहे. चंद्रपूरमध्ये 46.4 अंश सेल्सियस असे उच्चांकी तापमान नोंदवले गेले. उष्णतेच्या लाटांचा सामना जनतेला करावा लागत आहे. त्यात संभाव्य पाणीटंचाईच्या शक्यतेची भर पडली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमधील आणि नाशिक विभागातील धरणांमधील जलसाठा साधारणत: 40 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. साधारणत: फेबु्रवारी महिन्यापासून धरणांमध्ये किती जलसाठा शिल्लक आहे याचे वृत्त माध्यमात अधूनमधून प्रसिद्ध होउ लागते. एका बाजूला हंगामी पावसाचे अंदाज व्यक्त व्हायला लागतात तर दुसर्‍या बाजूला संभाव्य पाणीटंचाईची शक्यता लोकांना भेडसावते. तथापि जाहीर झालेली आकडेवारी पाण्याचा शहाणपणाने वापर करायला माणसाला प्रेरणा देऊ शकते. गेल्या महिन्यापर्यंत धरणांमध्ये पुरेसा जलसाठा शिल्लक आहे. राज्यावर पाणीटंचाईचे सावट नाही असे सांगितले जात होते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत धरणांमध्ये 60 टक्क्यांच्या वर पाणी शिल्लक असल्याचे सांगितले जात होते. तथापि त्यामुळेच पाण्याचा वापर सढळपणे वाढला असावा का? भर उन्हात नळी लावून गाड्या धुण्याची चैन सुरुच आहे. पाहुण्यांना पेलाभर पाणी देऊ नका, त्यांचे उष्टे पाणी फेकून देऊ नका. शॉवरखाली स्नान करु नका. बेसिनमधील नळ चालू करुन दाढी करु नका. पाणी कधीच शिळे होत नाही. अशा अनेक सूचना तज्ञमंडळी वेळोवेळी जनतेला ऐकवत असतात. पण प्रत्यक्षात काय घडते, हे आपण सारेच पाहातो. खरे तर माणसाच्या छोट्या छोट्या कृती मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धन करु शकतात. ज्याची आता अचानक नितांत गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता माणसे काही प्रमाणात नक्कीच कमी करु शकतात. मार्च महिन्यात वापरासाठी पुरेसा असलेला जलसाठा एप्रिल महिन्यात इतक्या वेगाने कमी कसा झाला? मार्च महिन्यातही तापमानाचा पारा चढताच होता. तो अधिकाधिक वाढेल असा इशारा हवामानतज्ञही देतच होते. तथापि महिन्यामहिन्याला शिलकी पाणीसाठ्याचा अंदाज देताना मार्च आणि एप्रिलमध्ये इतकी तफावत कशी पडू शकते? जलसाठ्याची आकडेवारी जाहीर करताना किती संबंधित अधिकारी पुरेसा अभ्यास करत असतील? ‘शहाणे करुन सोडावे सकल जन’ हे किती अवघड काम आहे याची जाणीव अधिकार्‍यांना नसावी का? तरीही धरणांच्या जलसाठ्याबाबत सतत परस्पर विरोधी विधाने सर्रास कशाच्या आधारावर केली जातात? पाण्याला जीवन म्हटले जाते. निदान त्याचा तरी राजकारणाचा विषय करु नये. जलसाठ्याविषयी लोकांचा गोंधळ उडवण्यापेक्षा पाण्याचा गैरवापर कायमस्वरुपी टळेल असे पर्याय तज्ञांनी लोकांना सुचवायला हवेत. निदान सामान्यांच्या मनात अकारण गोंधळ निर्माण करतील अशाप्रकारे पाण्याच्या साठ्याची आकडेवारी प्रसिद्ध करणे टाळता येणार नाही का?

- Advertisment -

ताज्या बातम्या