Monday, May 6, 2024
Homeअग्रलेखसंध्याछाया का भिवविती हृदया?

संध्याछाया का भिवविती हृदया?

संध्याछाया भिवविती हृदया..ही कवी भा.रा.तांबे यांची कविता. दुर्दैवाने तशीच वेळ अनेक ज्येष्ठांवर आली आहे. शासनाच्या सामाजिक न्याय व सबलीकरण विभागातर्फे सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 या क्रमांकाची हेल्पलाईन चालवली जाते. ज्येष्ठांच्या तक्रारींचे निवारण केले जाते. या क्रमांकावर मदत मागणार्‍या ज्येष्ठांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. रोज सुमारे पाचशे तक्रारी या क्रमांकावर दाखल होत आहेत. मुले सांभाळत नाहीत, पेन्शन परस्पर काढून घेतात, पोटभर जेवायला देत नाहीत आणि आरोग्याची काळजी घेत नाहीत असेच बहुसंख्य तक्रारींचे स्वरुप असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. काही मुले आईवडिलांना घराबाहेर काढतात. गावात किंवा रस्त्यात सोडून निघून जातात. हरियाणातील उच्चशिक्षित घरातील आजोबा-आजींनी याच कारणासाठी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक पत्र लिहून ठेवलेले आढळले. त्यात त्यांनी त्यांच्या वेदना मांडलेल्या होत्या. मुलाकडे कोट्यवधीची संपत्ती आणि नातू प्रशासकीय अधिकारी असल्याचे त्या पत्रात त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या तक्रारींचे स्वरुपही उपरोक्त प्रकारचे आढळले. भारतीय संस्कृती माता पित्यांचा आदर करायला शिकवते. अजुनही काही ठिकाणी अस्तित्व टिकवून असलेली संयुक्त कुटुंबपद्धती पाश्चात्य लोकांना आश्चर्यचकित करते. कुटुंबाचे आधारवड असे ज्येष्ठांचे वर्णन अनेक कवी करतात. ज्येष्ठांना घरातील संस्कारांची शाळा मानले जाते. हा वारसा का हरवत चालला आहे? वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही समाजाची गरज म्हणावी की माणसांची अगतिकता? अनेक घरांमध्ये ज्येष्ठांची परवड सुरु असल्याचे हेल्पलाईनकडे दाखल होणार्‍या तक्रारींवरुन दिसते. काही ज्येष्ठांनी मदत मागण्याचे धाडस दाखवले आहे तथापि कुटुंबातील गोष्टींचा बभ्रा नको अशीच अनेकांची भावना असणार. ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन’ करणार्‍या ज्येष्ठांची संख्या कदाचित जास्तही असू शकेल. समाजाची ही अधोगती म्हणावी का? ज्येष्ठांना समजून घेण्यात पुढची पिढी कमी पडत असावी का? ज्येष्ठांना नेमके काय हवे असते? मायेची ऊब, सुखाचे चार शब्द, संवाद, आदर आणि मानसिक आधार. तोही द्यावा असे त्यांच्या मुलांना का वाटत नसावे? अर्थात, ज्येष्ठांच्या परवडीचा दोष सरसकट मुलांना देणे योग्य ठरणार नाही. वाढत्या वयाबरोबर ज्येष्ठांची वर्तणूक काहीशी विक्षिप्त होत जाते. ज्येष्ठ नकारात्मक विचार करतात. घरातील वातावरण आणि सदस्यांबद्दल तक्रारीचा सूर आळवतात अशी तक्रार मुले करतात. तर मुले दुर्लक्ष करतात. परावलंबित्वाची आठवण करुन देतात. ज्येष्ठतेचा आदर ठेवत नाहीत. त्यांचे बघून नातवंडेही तसेच वागतात अशी तक्रार ज्येष्ठ करतात. गवताचे एक पाते वाकवले तर ते पटकन वाकते. पण ताकद लावली तरी गवताचा भारा वाकता वाकत नाही असे म्हणतात. तद्वतच या समस्येत सुवर्णमध्य काढणे ही तरुण पिढीची जबाबदारी नाही का? ऐकत नाहीत या सबबीखाली आईवडिलांना हीन वागणूक देणे किंवा घरातून हाकलून देणे हा पर्याय असू शकत नाही. त्यापेक्षा प्रयत्न केला आणि त्यांना समजून घेतले तर त्यांचे ज्येष्ठत्व आणि घरातील वातावरण आनंदी राखता येऊ शकेल. वृद्धत्व ही अटळ क्रिया आहे हे विसरुन कसे चालेल? आईवडिलांशी दुर्वतन करुन पुढच्या पिढीसाठी कोणता आदर्श उभा करत आहोत याचेही भान ठेवावे लागेल. ‘जे पेरले तेच उगवते’ हे ज्येष्ठांना जगणे नकोसे करणार्‍या मुलांनी लक्षात घेतलेले बरे. ReplyReply allForward

- Advertisment -

ताज्या बातम्या