असोचेमच्या सोशल डेव्हलपमेंट फाऊंडेशनने देशातील तीन हजार कामकरी माता-पित्यांविषयी एक अध्ययन केले होते. त्यातून असे दिसून आले की, कामकरी माता-पित्यांजवळ त्यांच्या मुलांना देण्यासाठी वेळ इतका कमी झाला आहे की, तो दिवसाकाठी केवळ 20 मिनिटे इतका आटला आहे. त्याहून अधिक वेळ माता-पिता आपल्या मुलांना देऊ शकत नाहीत. मुलांच्या विकासाच्या दृष्टीने ही निश्चितच वाईट बाब आहे. मुलांमध्ये सर्जनशील व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्यासाठी शिक्षण, शिक्षक आणि पालक या सर्वांमध्ये सुसंवाद असण्याची गरज आहे.
ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागून आत्महत्येपर्यंत पोहोचलेल्या मुलांच्या कहाण्या सातत्याने ऐकायला मिळतात. या विषयावर भरपूर चर्चा आणि विचारविनिमय होऊनसुद्धा अशा घटनांवर आपण अंकुश लावू शकलेलो नाही. त्याचे एक कारण असे की, आजकाल मुले ही आपल्या प्राधान्यक्रमात अगदी शेवटच्या पायरीवर आहेत. मुलांची एक स्वतंत्र दुनियाच तयार झाली आहे. शिकण्या-सवरण्याच्या कोवळ्या वयात मुले वयात येऊ लागली आहेत. सोशल मीडियाच्या नव्या आभासी दुनियेने त्यांच्यासमोर वेगळाच समाज आणून ठेवला आहे. कुटुंबात आजी-आजोबा नाहीत. आई-वडील मुलांच्या दुनियेपासून दूर गेले आहेत. कारण नवउदार जागतिक व्यवस्थेत सामाजिक आणि आर्थिक दबावामुळे आई-वडील आणि मुलांमधील अंतर वाढताना स्पष्ट दिसत आहे. याहूनही कटू सत्य असे की, मुलांचे बालपण आता पूर्णपणे उपभोगवादाच्या विळख्यात सापडले आहे.
देश-विदेशात झालेल्या संशोधनावरून जी आकडेवारी हाती आली आहे त्यावरून असे दिसून येते की जागतिकीकरणाच्या काळातील धावपळीच्या जगण्याने लहान मुलांच्या डोळ्यांमधून झोपच हिसकावून नेली आहे. मुले आता एकलकोंडी आणि हिंसक होऊ लागली आहेत. मुलांना कुटुंबाशी जोडणारे धागेही कमकुवत झाले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटले होते की, देशातील 42 टक्के मुले निद्रानाशाच्या तक्रारीने ग्रस्त आहेत आणि त्यामुळे झोपेतून घाबरून उठणे, झोपेत चालणे, बडबडणे, रडणे आणि भीतीदायक स्वप्ने पडणे अशा समस्या त्यांना सतावत आहेत. अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथील सेंट जोसेफ विद्यापीठाकडून भारतातील सुमारे चार हजार मुलांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यानंतर जे निष्कर्ष काढण्यात आले त्यानुसार भारतीय मुलांना युरोपिय मुलांच्या तुलनेत कमी झोप मिळते, हे स्पष्ट झाले. परिणामी, मुलांचा नैसर्गिक विकास होऊ शकत नाही. खेळण्या-बागडण्याच्या आणि खाण्या-पिण्याच्या वयातच त्यांच्यात अनेक विकृती जाणवू लागल्या आहेत.
मुले घरातून पळून जाणे, आक्रमक होणे, एकांतात राहू लागणे, मोबाईलच्या जगात गुंतून पडणे, मोबाईल गेमला प्रतिक्रिया म्हणून आत्मघाताच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होणे, अशा अनेक सामाजिक विकृतींच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील आणि शाळेतील वातावरणाची पार्श्वभूमी तपासणे नक्कीच आवश्यक बनले आहे. मुलांच्या बदलत्या व्यवहारांसाठी केवळ त्यांना दोषी मानून चालणार नाही. मुलांच्या बालपणाला दिशा देणारी कुटुंबसंस्था, शाळा यांच्याही भूमिकेचा कुठेतरी विचार करायला हवा. शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये भौतिक जीवनाच्या बदलत्या गरजांमुळे आई-वडील आणि मुलांदरम्यान एरवी होणार्या मनमोकळ्या संवादाचा पायाच कुठेतरी ठिसूळ झाला आहे. एखाद्या घरात आजी-आजोबा असतीलच तरी त्यांच्या नंतरच्या दुसर्या पिढीचे नियंत्रण त्यांच्या हातून निसटून जाताना दिसत आहे. आज विभक्त कुटुंबे आदर्श बनली आहेत. शाळांची जबाबदारीही पुस्तकी शिक्षणापुरतीच मर्यादित राहिली आहे. या पार्श्वभूमीवर शाळेत मुलांचे होणारे शैक्षणिक सामाजिकीकरण आणि घरात होणारे चांगले संगोपन या दोन्ही पातळ्यांवर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
असोचेमच्या सोशल डेव्हलपमेंट फाऊंडेशनने देशातील तीन हजार कामकरी माता-पित्यांविषयी एक अध्ययन केले होते. त्यातून असे दिसून आले की, कामकरी माता-पित्यांजवळ त्यांच्या मुलांना देण्यासाठी वेळ इतका कमी झाला आहे की, तो दिवसाकाठी केवळ 20 मिनिटे इतका आटला आहे. त्याहून अधिक वेळ माता-पिता आपल्या मुलांना देऊ शकत नाहीत. मुलांच्या विकासाच्या दृष्टीने ही निश्चितच वाईट बाब आहे. कामकरी माता-पित्यांकडे वेळेची कमतरता असल्यामुळे आता ते शाळा सुटल्यावर मुलांना होमवर्कसाठीही मदत करत नाहीत. आठवड्याच्या अखेरीससुद्धा मुलांच्या शेजारी बसून ते एकवेळचे जेवण करू शकत नाहीत, असेही अध्ययनातून निष्पन्न झाले आहे. म्हणजेच, मुलांचे बालपण हळूहळू एकाकी होऊ लागले आहे. मुले आणि त्यांच्या पालकांमध्ये मुक्त संवाद होत नसल्यामुळे मुले समाजजीवनापासून दूर जाऊ लागली आहेत. या उपभोगवादी समाजात प्रत्येक वस्तू एक उत्पादन बनत असताना मुलेही या संस्कारांपासून आता दूर राहिलेली नाहीत. बाजारवादी संस्कृतीसमोर कुटुंब आणि शाळा या संस्था खूपच तकलादू ठरू लागल्या आहेत. संयम, शिस्त, परंपरा, मूल्ये, सहानुभूती आणि प्रेम यांसारखे शब्द आता मुलांपासून दूर जाताना दिसत आहेत.
आज इलेक्ट्रॉनिक माध्यमे, सोशल मीडिया, कॉम्प्युटर, इंटरनेट, चित्रपट अशा विविध माध्यमांनी शाळा आणि कुटुंब या व्यवस्थांचे स्थान मुलांच्या बालपणातून दुय्यम केले आहे आणि त्यांच्या भावविश्वात स्वतः ठाण मांडले आहे. मुलांच्या बालपणात माता-पिता आणि शाळांची भूमिका दुय्यम झाल्याचा फायदा बहुराष्ट्रीय कंपन्या घेत आहेत. बाजारवादाच्या जाहिरात संस्कृतीला लहान मुलांमध्ये भावी ग्राहक दिसत आहेत. अनेक सर्वेक्षणांमधून असे दिसून आले आहे की, आज कुटुंबांना जेवढ्या मूलभूत गरजा जाणवतात, त्यातील सुमारे 90 टक्के बालकेंद्रित असतात.
एक कटू सत्य असेही आहे की, आजच्या एकल कुटुंबांचे आपल्या मुलांशी असलेले नातेही डळमळीत होत चालले आहे. माता-पित्यांना सवड मिळत नाही. त्यामुळे मुले एकतर घराच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त होऊन मोबाईलच्या दुनियेत रममाण होतात किंवा निराशेच्या दिशेने जाऊ लागतात. मोबाईलच्या दुनियेचे एक वास्तव असे की, त्यातून बाहेर पडून जेव्हा मुलांना वास्तवातील आव्हानांशी दोन हात करावे लागतात तेव्हा एकतर ते पलायनवादी दृष्टिकोन स्वीकारतात किंवा नैराश्याच्या गर्तेत बुडून जातात. आपल्यासमोर अनेक उदाहरणे आहेत. कुटुंबांमध्ये मुलांना जे संरक्षण, वात्सल्य आणि स्नेहाची भावना मिळते, तीच त्यांना सामूहिक विचार आणि एकमेकांशी जोडण्याची प्रेरणा देते आणि तेच त्यांना संरक्षणही प्रदान करते, हे लक्षात घेतले पाहिजे. माध्यमांनी मुलांचे कल्पनाविश्व आणि वास्तव यांच्यात घालमेल सुरू केली असून त्यांना आक्रोश, हिंसा आणि अश्लीलतेच्या केंद्रस्थानी आणून ठेवले आहे.
आक्रमकता, राग आणि हिंसा यांसारखे नकारात्मक घटक आता मुलांच्या व्यक्तिमत्त्वात अगदी सामान्य होऊन जात आहेत. ही परिस्थिती ना शिक्षण व्यवस्थेची धुरा वाहणारे स्वीकारत आहेत ना पालक! मुलांमध्ये सर्जनशील व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्यासाठी शिक्षण, शिक्षक आणि पालक हे तीनही घटक त्यांच्या मनातील आक्रोश कमी करण्यासाठी योगदान देऊ शकतात. त्याचप्रमाणे निद्रानाशासारख्या समस्यांचे निराकरण करू शकतात. मात्र यासाठी सर्वांमध्ये सुसंवाद असण्याची गरज आहे.