Thursday, May 9, 2024
Homeनगरअतिवृष्टीची मदत न मिळालेल्या नुकसानग्रस्तांचा आत्मदहनाचा प्रयत्न

अतिवृष्टीची मदत न मिळालेल्या नुकसानग्रस्तांचा आत्मदहनाचा प्रयत्न

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यात सुमारे चार महिन्यापूर्वी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या असंख्य शेतक-यांना अजुनही त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेवगाव येथील कराड वस्ती तसेच लांडे वस्ती येथील सुमारे 19 कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्ते रामकिसन कराड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यासाठी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

- Advertisement -

यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून नंतर सोडून दिले. तालुक्यात 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर अशा दोन दिवसात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे नांदणी, चांदणी, भागीरथी व ढोरा नदीला पूर आल्याने तालुक्यातील वरूर, भगूर, आखेगाव, खरडगाव, वडुले बुद्रुक ,जोहारापूर,ठाकूर पिंपळगाव या गावात नदीपात्र सोडून पाणी नागरिकांच्या घरात व शेतीत घुसल्याने शेतक-यांच्या घरातील धान्य, संसार उपयोगी वस्तु, कपडे तसेच पशुधन वाहुन गेले. शेती खरवडून गेली, पिकांचेही आतोनात नुकसान झाले.

शेतकर्‍यांच्या नुकसानीचे महसूल व कृषी यंत्रणेने पंचनामे केले. राज्य सरकारने शेतक-यांच्या नुकसान भरपाई पोटी रक्कमही उपलब्ध केली. मात्र कराड वस्ती व लांडे वस्तीवरील शेतकरी कुटुंबियांना त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अजूनही मिळालेली नाही. याबाबत चौकशी केली असता संबधित अधिकार्‍यांनी आपले नुकसान भरपाईचे पंचनामे प्राप्त झाले नसल्याची माहिती दिली. त्यामुळे शेवगाव मधील सुमारे 150, वडुले येथील 100 व आखेगाव परिसरातील अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासुन वंचित असल्याबाबत रामकिसन कराड यांनी निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांचे लक्ष वेधले.

तालुक्यातील अनेक शेतकरी शासनाच्या या नुकसान भरपाईपासून अजुनही वंचित असल्याने शेवगाव येथील कराड वस्ती, व लांडे वस्ती वरील रामकिसन कराड यांच्यासह नवनाथ कराड, रामभाऊ लांडे, अलका कराड, त्र्यंबक कराड , गयाबाई कराड, महादेव बडे, तुकाराम बडे, गहिनीनाथ बडे, संजय बडे, एकनाथ बडे, भीमराज बडे, आण्णासाहेब बडे आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून आपल्यावर सुरु असलेल्या अन्यायाबाबत संबधितांचे लक्ष वेधले.

राज्य सरकारने शेतकर्‍यांना जी रक्कम उपलब्ध केली आहे. त्यांचे टप्प्याटप्प्याने वाटप सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी आंदोलक शेतक-यांना दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या