श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या एका सराईत आरोपीस शहरातील नेहरूनगर परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दपार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव, रमीझराजा आतार, भगवान थोरात आणि विशाल तनपुरे यांनी ही कारवाई केली.
शुक्रवारी दि. 17 जुलै श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोधमोहीम सुरू असताना गुप्त माहितीच्या आधारे नेहरूनगर परिसरात गौरव रमेश सोनटक्के (रा. दशमेशनगर, पंजाबी कॉलनी, वार्ड क्र. 1, श्रीरामपूर) हा हद्दपार आदेशाचा भंग करून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संबंधित आरोपीस दि. 22 जानेवारी 2026 पासून एक वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याची खात्री झाली. असे असतानाही तो जिल्ह्याच्या हद्दीत विनापरवाना वावरत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस अंमलदार रमीझराजा रफीक आतार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




