मुंबई । Mumbai
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचा उत्साह आज केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात पाहायला मिळत आहे. या निमित्त मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला असून, राज्य प्रशासनाच्या वतीनेही भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी चैत्यभूमीवर उपस्थित राहून डॉ. आंबेडकरांना पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. “एक व्यक्ती, एक पेन आणि एक पुस्तक म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,” अशा शब्दांत त्यांनी महामानवाचे वर्णन केले. आंबेडकरांच्या लेखणीतून उतरलेल्या संविधानाने भारतात समतेचे राज्य प्रस्थापित केले असून, समाजातील जातीभेद, धर्मभेद आणि स्त्री-पुरुष विषमता संपवण्याचे महान कार्य केले आहे. मानवी मूल्यांना काळिमा फासणाऱ्या अनिष्ट प्रथांचा अंत करून मानवतेला प्रतिष्ठा मिळवून देणारे हे जगातील सर्वोत्तम संविधान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेची रचना करताना त्यांनी मांडलेले विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत. रिझर्व्ह बँकेची मूळ संकल्पना मांडण्यापासून ते चलनव्यवस्थेत सुवर्णाधारित (Gold Standard) तत्त्वांचा आग्रह धरण्यापर्यंत त्यांच्या विचारांची व्याप्ती मोठी होती. १९२३ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक तत्त्वज्ञान पुढे जगाने स्वीकारले. अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी मध्यंतरी डॉलरकेंद्रित धोरण स्वीकारले असले, तरी आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत पुन्हा एकदा जगभरात सोन्याच्या साठ्याला महत्त्व दिले जात आहे. यावरून डॉ. आंबेडकरांची दूरदृष्टी किती महान होती, हे सिद्ध होते.
चलनाच्या विनिमय दराबाबत बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, केवळ डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य पाहणे पुरेसे नाही. जागतिक अर्थकारणात ‘खरेदी शक्ती समता’ (पर्चेसिंग पॉवर पॅरिटी) ही संकल्पना अधिक निर्णायक ठरते आणि हेच तत्त्व डॉ. आंबेडकरांनी अनेक वर्षांपूर्वी मांडले होते. आधुनिक जागतिकीकरणाच्या युगातही आंबेडकरी अर्थशास्त्र तितकेच सुसंगत आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. चैत्यभूमी परिसरात करण्यात आलेली आकर्षक सजावट आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनामुळे जयंतीचा हा सोहळा अत्यंत चैतन्यमय वातावरणात पार पडला.





