Friday, May 3, 2024
Homeनगरबनावट आधार वापरून 108 सीमकार्ड केले अ‍ॅक्टिव्हेट

बनावट आधार वापरून 108 सीमकार्ड केले अ‍ॅक्टिव्हेट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट आधार कार्डचा वापर करून व्हिआय कंपनीचे 108 सीमकार्ड अ‍ॅक्टिव्हेट करून घेत त्याचे वितरण केल्याचा प्रकार सावेडी उपनगरात घडला आहे. याप्रकरणी अमोल अशोक टिळेकर (वय 38 रा. आरोहनगर, तागड वस्तीजवळ, पाईपलाईन रस्ता, सावेडी) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 12) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अंमलदार सचिन जगताप यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजता पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी सहायक निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, सुरज वाबळे, सतिष त्रिभुवन, जगताप यांना सांगितले की, सायबर पोलीस ठाण्याकडून पत्र प्राप्त झाले असून तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील वाणीनगर कमानीजवळ, पाईपलाईन रस्ता, सावेडी येथे प्राजक्त मोबाईल शॉपीमध्ये बनावट सीमकार्डची विक्री झाली आहे. याबाबत खात्री करून कारवाई करण्याचे आदेश निरीक्षक साळवे यांनी दिले. पोलिसांनी पंचासमक्ष नमूद ठिकाणी गेले असता त्यांना त्या नावाची मोबाईल शॉपी मिळून आली नाही. दरम्यान, त्यांना अमोल टिळेकर नावाचा इसम सीमकार्ड विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाली.

पोलिसांनी त्या इसमाचा शोध घेतला असता तो मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता तो व्हिआय कंपनीचा सबडिलर म्हणून काम करत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 मध्ये स्वत: चे व इतर नातेवाईकांचे वेगवेगळ्या वेषभुशामधील छायाचित्रे कस्टमरचे आधार कार्डवर वापरून बनावट आधारकार्ड तयार केले. त्या आधार कार्डच्या मदतीने व्हिआय कंपनीचे 108 सीमकार्ड अ‍ॅक्टिव्हेट करून ते वितरीत केले असल्याची त्याने कबुली दिली. त्याच्याकडून मोबाईल, बायोमेट्रीक मशीन, सीमकार्ड असा सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या