श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील गोंधवणी (Gondhwani) परिसरात सुरु असलेला बनावट देशी दारु अड्डा (Fake Desi Alcohol) श्रीरामपूर शहर पोलिसांनी उद्ध्दस्त केला. सदर ठिकाणाहून पोलिसांनी 1 लाख 66 हजार 320 रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल संपत ज्ञानदेव बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, पोलीस उपनिरिक्षक समाधान सोळंके यांना भैरवनाथनगर परिसरातील लता राऊत यांच्या मालकीच्या घरामध्ये बनावट देशी दारु बनवत असल्याची गुप्त माहीती मिळाली. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, आजिनाथ आंधळे, मच्छिंद्र कातखडे, सागर बनसोडे यांनी सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता तेथे तीन इसम बनावट देशी भिंगरी संत्रा दारु तयार करुन बाटल्यामध्ये भरुन सिल व लेबल लावताना मिळून आले.
त्यांना त्याचे नाव विचारले असता त्यांनी मोसीन इक्बाल सय्यद (वय 24, रा. संजयनगर वाणी टाकीजवळ वॉर्ड नं.02), अरबाज अनिस मलंग (वय 25, रा. गुलशन चौक जवळ वॉर्ड नं.02), अन्वर शब्बीर शहा (वय 47, रा. संजयनगर, डावखर मैदान, बर्फ कारखान्याजवळ) असे असल्याचे सांगितले. त्यांना सदर पत्र्याचे घर कुणाचे आहे, असे विचारले असता त्यांनी लता महादु राऊत (रा.वॉर्ड नं.02) यांच्या मालकीचे असून त्यांच्याकडून तीन हजार रुपये महिन्याप्रमाणे भाड्याने घेतल्याचे सांगतले.
बनावट देशी भिंगरी संत्रा दारु (Desi Alcohol) बनवण्यासाठी लागणारे स्पिरीट कोणाकडून आणले याबाबत चौकशी केली असता, त्यांनी प्रमोद बाळासाहेब फुलारे व राहुल बाळासाहेब फुलारे (रा. लोंढे मळा, खबडी जवळ, वॉर्ड नं.01, श्रीरामपूर) यांच्याकडून घेत असल्याचे सांगितले. सदर इसमाच्या राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम यांच्यासह पोलीस पथक पाठविले असता बनावट देशी भिंगरी संत्रा दारु व ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 1 लाख 66 हजार 320 रुपयाचा मुद्देमाल नष्ट (Destroyed) करण्यात आला.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 318(4), 338, सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम 65 (ई), (ड), 80, 81, 98, 104 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरिक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशान्वे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, अमोल पडोळे, आजिनाथ आंधळे, मच्छिंद्र कातखडे, सागर बनसोडे आदींनी पार पाडली.




