सोनई |वार्ताहर| Sonai
सोनई परीसरातील दोघांचा विश्वास संपादन करत व बनावट कागदपत्रे दाखवून दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर व नेवासा येथील दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल सुनील गडाख (वय 28) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, अनिकेत गायकवाड रा. उस्थळ दुमाला, ता. नेवासा याने सन 2024 मध्ये अतुल अनिल दोडके रा. निपाणी वडगाव, तालुका श्रीरामपूर याच्याशी माझी व माझा मित्र ऋषिकेश कैलास इलक यांची ओळख करून दिली व सीबीडी बेलापूर पनवेल महानगरपालिका येथे माझा वशिला असून येथे जागा शिल्लक असून तेथे नोकरीस लावण्याचे एकाचे 5 लाख रुपये लागतील असे सांगितले. अनिल व अनिकेत या दोघांनीही विश्वास संपादन करून 3 फेब्रुवारी 2024 पासून फोन पे व रोख स्वरूपात पाच लाख रुपये घेतले होते.
माझा मित्र ऋषिकेश कैलास इलग रा. मोरेचिंचोरे, तालुका नेवासा याचीही माझ्यासारखेच पाच लाख रुपये अतुल दोडके याने घेतले आहे आमचे दोघांचे मिळून 10 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. नोकरी संदर्भात विचारले असता दोघांनी उडवा-उडवीचीे उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे जॉइनिंग लेटर दिले. यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका सीबीडी बेलापूर येथील कार्यालयात जाऊन विचारणा केली असता येथे कोणतीच भरती नाही, तसेच आम्हांस दिलेले जॉईन लेटर हे खोटे आहे, असे सांगितले.
सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांचे स्वाक्षरीचे कायमस्वरूपी कर्तव्यावर हजर करून घेतले बाबतचा लेटरहेडचे छायांकित प्रती सादर केल्या आहेत. या फिर्यादीवरून अतुल अनिल दोडके व अनिकेत गायकवाड या दोघांवर भारतीय न्यायसंहिता बीएनएस 2023 कलम 318(2), 318(4), 340(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुरज मेढे पुढील तपास करत आहेत.




