मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
तालुक्यातील लखाने गाव शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये अवैधपणे सुरू असलेला देशी-विदेशी मद्य निर्मितीचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज छापा टाकत उध्वस्त केला. या कारवाईत मद्यनिर्मितीसाठी लागणारे साहित्य बनावट मद्य भरलेल्या बाटल्या व रिकाम्या बाटल्या तसेच वाहतुकीसाठी वापरले जाणारे पिकअप वाहन व दुचाकी असा सुमारे 14 लाख 51 हजार 240 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लखाने शिवारात अवैधरित्या पत्र्याच्या शेडमध्ये बनावट देशी-विदेशी मद्याची निर्मिती केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळाली असता मालेगाव विभागाचे निरीक्षक लीलाधर पाटील, दुय्यम निरीक्षक सागर नलवडे, रियाज शेख व कळवण विभागाचे निरीक्षक, सी. एच. पाटील, आर.जे. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली पथकाने पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या कारखान्यावर छापा मारला.
गावाच्या शिवारात पत्र्याची शेड असलेल्या कारखान्यात बनावट मद्याची निर्मिती केली जात असल्याची माहिती ग्रामस्थांना देखील नव्हती. पथकाने कारखान्यात प्रवेश करताच मद्य निर्मितीसाठी लागणारे साहित्य तसेच देशी-विदेशी मद्याचे स्टिकर तसेच बनावट मद्याच्या भरलेल्या व रिकाम्या बाटल्या असे लाखो रूपयांचे साहित्य दिसून आले. पोलिसांनी हे साहित्य तसेच मद्य वाहतुकीसाठी वापर केला जात असलेल्या पिकअप वाहन क्र. एम.एच.-18-एम.-3680 व दुचाकी क्र. एम.एच.-98-ए.आर.-6418 ही दोन्ही वाहने जप्त केली. पथकाने राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतीबंध असलेला बनावट मुद्देमाल देखील यावेळी जप्त केला गेला.
मद्यसाठा निर्मिती करणारा व मद्यसाठा घेणारा, पुरवठादार तसेच वाहनमालक यांच्यासह इतर अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





