Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याजीवन समृद्ध करणारी विलक्षण वारी

जीवन समृद्ध करणारी विलक्षण वारी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

वनविभागातून निवृत्त झालेले सुधीर दराडे ( Sudhir Darade ) यांनी वारीदरम्यान ‘देशदूत’सोबत व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दात..

- Advertisement -

वनविभागात सेवेत असताना दरवर्षी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी (Saint Nivruttinath Maharaj ) श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ( Trimbakeshwar )येथून नाशिक येथे आल्यावर त्र्यंबकनाका परिसरात पालखीचे दर्शन घ्यायचो. रथासोबत काही अंतर चालायचो, तेव्हा दिंडीत सहभागी झालेल्या वारकरी मंडळींचे कौतुक वाटायचे. ऊन, वारा, पावसात हरिनामाचा गजर करत सुमारे महिनाभर पायी चालत वारकरी कसे पंढरपूरला पोहोचतात याचे अप्रूप वाटायचे आणि आपण कधी वारीत सहभागी होऊ याबाबत मनाला हुरहूर लागायची.

करोना महामारीमुळे दोन वर्षे वारकर्‍यांची पायी वारी झाली नाही. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पायी वारी होणार असल्यामुळे तसेच सेवानिवृत्त असल्यामुळे वारीत सहभागी होऊन वारीचा अनुभव घ्यायचाच असे ठरवले.

गरजेपुरते कपडे, आवश्यक औषधे आदी सामानासह मी वारीत सहभागी झालो. निवृत्तिनाथ समाधी मंदिराचे पुजारी जयंत महाराज गोसावी यांच्या दिंडीत 13 जून रोजी सकाळी 10 वाजता श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पालखी प्रस्थान सोहळ्यापासून पायी वारीत सहभागी झालो. वारकर्‍यांमध्ये कमालीचा उत्साह होता. प्रशासनातर्फे तसेच सेवाभावी संस्थांमार्फत वेळोवेळी वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. पालखीच्या दैनंदिन कार्यक्रमानंतर मुक्कामाच्या गावात मिळेल त्या निवार्‍यात झोपायचे.

आपण शहरात राहून सुखवस्तू जीवन जगत आलो आहोत. दररोज सुमारे 18 ते 22 कि.मी. ऊन, वारा, पावसात चालणे तसे कठीण पण वारीत हरिनामाचा गजर करत हे सहज शक्य झाले. मुक्कामाच्या ठिकाणी मिळेल त्या जागेवर निवारा घ्यायचा. पण पहाटे 4 वाजता उठून टँकरखाली आंघोळ केली की सर्व वेदना पळालेल्या असायच्या. नवी ऊर्जा.. चेतना निर्माण व्हायची… हे सारे अद्भूत होते. माझ्यासारखा शहरात सुखात आयुष्य जगलेल्या व्यक्तीकडून तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर वारी विनासायास पूर्ण करून घेण्यासाठी एका अध्यात्मिक शक्तीची सतत सोबत असल्याची अनुभूती मला आली. अत्यंत कमी जागेत झोपताना आजूबाजूला थंडी, ताप, सर्दी, खोकल्याचे वारकरी असायचे. अशा वातावरणात प्रकृती व्यवस्थित फक्त पांडुरंगाच्याच कृपेमुळे राहिली. हादेखील सुखद अनुभवच म्हणावा लागेल.

पंढरपूर जसजसे जवळ येऊ लागले तसे पांडुरंगाच्या भेटीची आस अधिक वाढू लागली. चंद्रभागेत लोहदंड तीर्थ येथे स्नान केल्यानंतर भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन महाद्वाराकडे जाताना डोळे भरून आले. आसवे थांबत नव्हती. पांडुरंगा, तू किती कृपाळू आहेस. कोणताही त्रास होऊ न देता तू माझी वारी पूर्ण करून घेतली. शेवटी एकच म्हणेल.. एक अद्भूत आणि विलक्षण असा हा अनुभव होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या