कर्जत |प्रतिनिधी| Karjat
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने भांडेवाडी (ता. कर्जत) गट क्रमांक 510/2 जमीन खरेदीप्रकरणी आर्थिक फसवणूक केली. या व्यवहारातील दिलेल्या 52 लाख रुपयांचा धनादेशही वटला नाही. त्यामुळे जमिन गेली आणि मोबदलाही मिळाला नाही. या प्रकाराबाबत प्रशासनाकडे दाद मागितली. मात्र तेथेही दखल घेतली गेली नाही, असा आरोप दूरगाव (ता. कर्जत) येथील शेतकरी कुंडलिक जायभाय यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी आज मंगळवार (दि.1) पासून कर्जत येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती देतांना जायभाय म्हणाले, बारामती अॅग्रोचे प्रतिनिधी सुभाष गुळवे यांनी ऑगस्ट 2021 मध्ये माझी समक्ष भेट घेतली. आ. पवार यांना कर्जतमध्ये राहण्यासाठी घर बांधायचे आहे. यासाठी तुमच्या मालकीची भांडेवाडीचे गट क्रमांक 510/2 एकूण 5 एकर पैकी 2 एकर क्षेत्र घर बांधणीसाठी पसंत पडलेले आहे. त्यानुसार चर्चे अंती जायभाय यांच्या मालकीची 2 एकर क्षेत्र रोहित पवार यांचे घर बांधण्यासाठी देण्याचे ठरले. उर्वरित 3 एकर जागा संपूर्ण विकसित करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. आ. पवार यांच्यावर विश्वास ठेवत तत्कालीन बाजारभावापेक्षा कमी किमतीने जागेचा व्यवहार ठरला.
ही जागा 20 ऑक्टोबर 2021 रोजी बारामती ग्रोच्या नावाने करून घेऊ, असे गुळवे यांनी सांगितले. मात्र, त्या दिवशी खरेदीखत न करता त्यांनी साठेखताचा दस्त करून घेतला. 2 एकर जागेचा मोबदला म्हणून 52 लाख रुपयांचा धनादेश 18 ऑक्टोबर 2021 रोजी दिला. सदरचा व्यवहार झाल्याच्या दोन दिवसांनी 22 ऑक्टोबर 2021 रोजी 52 लाख रुपयांचा धनादेश जायभाय यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया अहमदनगर या खात्यात भरला. मात्र हा धनादेश न वठता परत आला. त्यानंतर वारंवार विनंती करूनही जागेचे कोणत्याही प्रकारचे पैसे देण्यात आले नाहीत, असा आरोप जायभाय यांनी केला.
तसेच या प्रकरणी कोर्टात दाद मागून कोर्टाने देखील माझी फसवणूक झाल्याचे निरिक्षण नोंदवत मनाई हुकूमाचा आदेश दिलेला आहे. मात्र, त्यानंतर मला प्रशासनाकडून सहकार्य न मिळाल्याने आ. पवार यांच्या बारामती अॅग्रोने खोट्या पिक नोंदी लावून माझी जमिन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आ. पवार यांच्या अन्यायाविरोधात आज कर्जत तहसीलसमोर उपोषण करण्याचा निर्धार पिडीत शेतकरी यांच्यावतीने करण्यात आली अॅड. कृष्ण जायभाय केली.