अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोतवाली पोलिसांकडून शहरातील कायनेटीक चौकात सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान एका शेतकर्याकडील एक लाख 95 हजार रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. शुक्रवारी (15 नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास शाहरूख नसीर सय्यद (वय 27 रा. शिरापूर, ता. आष्टी, जि. बीड) हे कायनेटिक चौकातून जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्यांना थांबविले. पोलिसांनी पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक लाख 95 हजार रुपयांची रोकड आढळून आली. 500 रूपये किमतीच्या 390 नोटा त्यांच्याकडे होत्या. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहिता काळात कोणत्याही व्यक्तीला त्याच्या ताब्यात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाळगता येत नाही.
शाहरूख नसीर सय्यद यांच्या ताब्यात एक लाख 95 हजार रूपये मिळून आले. त्या रक्कमेविषयी त्यांना योग्य माहिती देता न आल्याने त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने ही रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील व त्यांच्या सहकार्यांनी ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.