Thursday, May 2, 2024
Homeनगरएकाच शेतकर्‍याच्या पाच गायी दगावल्या

एकाच शेतकर्‍याच्या पाच गायी दगावल्या

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील केलवड येथे विषारी गवत व कन्हेर या वनस्पतीचा पाला खाल्ल्याने एकाच शेतकर्‍याच्या पाच गायी दगावल्या आहेत. त्यामुळे या शेतकर्‍याचे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

केलवड येथील किशोर ज्ञानदेव घोरपडे या शेतकर्‍याच्या 5 गायी दगावल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व गायी 80 ते 90 हजार रुपये किंमतीच्या होत्या. एकाच गोठ्यातील पाच गायी दगावल्याने मोठा आर्थिक फटका या शेतकर्‍याला बसला आहे. या शेतकर्‍याच्या गायींनी गवत तसेच कन्हेर या वनस्पतीचा पाला खाल्ला होता. काल पहाटे दोन गायी सुरुवातीला गुंगून पडल्याचे घोरपडे यांच्या लक्षात आले.

दिवसभरात इतर गायींनाही बाधा झाल्याचे लक्षात आल्याने आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्विय सहायक प्रमोद रहाणे, लबडे यांनी याबाबत सर्व पशुवैद्यकिय डॉक्टरांना उपचारासाठी माहिती दिली. केलवड येथील सर्व पशुवैद्यकीय प्रॅक्टीस करणारे डॉक्टर, राहाता, शिर्डी, लोणी, नगर येथून डॉक्टरांची टिम केलवड मध्ये दाखल झाल्या. जि.प. व पंचायत समितीचे डॉक्टरही दाखल झाले. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे हे ही दाखल झाले. या सर्वांनी शर्थिचे प्रयत्न करून गायींवर उपचार केले. सलाईन व अन्य औषधे गायींना देण्यात आले. परंतु यश आले नाही. या पाचही गायी काल सायंकाळी 5 पर्यंत क्रमाक्रमाने दगावल्या. या सर्व गायींचे शवविच्छेदन करून नमुने डॉ. तुंबारे यांनी नगरला तपासणीसाठी नेले आहेत.

केलवड येथील किशोर ज्ञानदेव घोरपडे या तरुण शेतकर्‍याने पतसंस्थेचे कर्ज काढून गायी खरेदी केल्या होत्या. सर्व गायी व्याल्यानंतर त्यांचे 80 ते 90 लिटर दूध जात होते. यातील काही गाभण होत्या, त्यामुळे त्यांचे सध्या 40 लिटर दूध सुरू होते. यावरच त्यांची उपजिवीका होती. एक गावरान गायही आहे. तीच्यावरही उपचार सुरू आहेत. दगावलेल्या सर्व गायी मोठ्या असल्याने या शेतकर्‍याला मोठा फटका बसला.

डॉ. सुनील तुंबारे यांचेसह डॉ. पी. डी. नेहरकर, डॉ. किशोर शेळके, डॉ. शैलेश बन, डॉ. प्रज्ञा ओहळ, डॉ. विकास गमे, डॉ. बापू घोरपडे, डॉ. अक्षय घोरपडे, डॉ. शरद गमे, डॉ. दीपक गमे आदींनी गायींचा जीव वाचावा म्हणुन शर्थीचे प्रयत्न केले.

पशुपालकांनी आपल्या गायींचा विमा उतरविण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील गायी, गुरांना कशातून विषबाधा होईल हे सांगता येत नाही. मागील वर्षीही साथ रोगाने केलवडची 100 हून अधिक जनावरे दगावली होती. आमदार राधाकृष्ण विखे पाटील व जि.प. च्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्यामुळे त्यांना जि.प. ची मदत मिळाली होती. शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांचा विमा उतरवावा.

– नामदेव घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते

केलवड च्या शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्यात अनेक गवत उगवून येते, त्याती काही गवत ही विषारी असतात. ते आपल्या जनवारांना टाकू नये. काळजी घ्यावी, मागील वर्षीही केलवडला अनेक जनावरे दगावली होती. जि.प. च्या वतीने त्या 80 दूध उत्पादकांच्या मोठ्या जनावरांना दहा हजार तर छोट्या जनावरांना 3 हजार मदत दिली होती. या शेतकर्‍याचाही आपण प्रस्ताव करणार आहोत. शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी.

– डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अहमदनगर

- Advertisment -

ताज्या बातम्या