अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यात सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूरामुळे झालेल्या शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीपोटी तर ऑक्टोबर 2025 मध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना अनुक्रमे 90 कोटी 86 लाख 97 हजार आणि 482 कोटी,10 लाख 69 हजाराच्या मदतीसाठी निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात नगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्यांना 12 कोटी 38 लाख 18 हजार रूपयांची मदत मिळणार आहे. याबाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकर्यांना मदत आणि दिलासा देण्यास शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. शासनाने बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करुन मदत देण्याच्या घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना उभारी मिळणार आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर व सततचा पाऊस, अवकाळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकर्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्र.2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार (0-2 हेक्टर) रूपये 482,10,69,000/- (रुपये चारशे ब्याऐंशी कोटी दहा लक्ष एकोणसत्तर हजार फक्त) आणि (2-3 हेक्टर) रू. 2,29,23,000/- (रूपये दोन कोटी एकोणतीस लक्ष तेवीस हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील 29256 शेतकर्यांच्या 6703 हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले होते. या सर्वांना 7 कोटी 63 लाख 54 हजार रूपयांचा मदतनिधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सप्टेंबर मधये अहिल्यानगर जिल्ह्यातील 6554 शेतकर्यांच्या 1015.99 हेक्टरवरील शेतजमिनीचे नुकसान झाले होते. त्यापोटी 4 कोटी 74 लाख 64 हजार रूपयांचा निधी मिळणार आहे.




